"काहीही झालं तरी जातनिहाय जनगणना होणार अन् आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणारच"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 04:09 PM2024-11-06T16:09:50+5:302024-11-06T17:37:38+5:30

राहुल गांधी यांनी नागपूरात येत भाजपासह आरएसएसवर निशाणा साधला, त्याशिवाय जातनिहाय जनगणनेबाबत पुन्हा मागणी केली. 

Maharashtra Assembly Election 2024 - RSS and BJP attack on Constitution, its not just book, they are attacking the voice of India - Congress MP Rahul Gandhi | "काहीही झालं तरी जातनिहाय जनगणना होणार अन् आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणारच"

"काहीही झालं तरी जातनिहाय जनगणना होणार अन् आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणारच"

नागपूर -  जातनिहाय जनगणनेवर मी बोलतो तेव्हा नरेंद्र मोदी माझ्यावर देश तोडण्याची भाषा करतो असा आरोप करतात. जातनिहाय जनगणनेवर काय भूमिका घ्यायची यावर RSS मध्येही मंथन सुरू आहे. त्यांनी कोणतीही भूमिका घेतली तरी जातनिहाय जनगणना करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आणि आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादासुद्धा हटवली जाईल असा निर्धार राहुल गांधी यांनी व्यक्त केला. नागपूरात आयोजित संविधान सन्मान संमेलनात राहुल गांधींनीभाजपा आणि आरएसएसवर तोफ डागली.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान हे केवळ एक पुस्तक नाही तर जगण्याचा मंत्र आहे. संविधानात भगवान बुद्ध, सम्राट अशोक, महात्मा बसवेश्वर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई अशा महापुरुषांचा आवाज आहे. संविधानातील विचार हजारो वर्षांपूर्वीचे आहेत. संविधानात सर्व जाती, धर्माचा, प्रदेशाचा आदर आहे. याच संविधानावर भाजपा व आरएसएस सातत्याने हल्ले करत आहेत. आरएसएस संविधानावर थेट हल्ला करु शकत नाहीत तर ते लपून हल्ला करतात. आरएसएसमध्ये हिंमत असती तर त्यांनी समोरुन हल्ला केला असता असा हल्लाबोल त्यांनी केला.  

तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी हे स्वत:बद्दल बोलत नसत, ते जेव्हा बोलायचे तेव्हा ते कोट्यवधी लोकांचा आवाज असायचा. संविधानात सर्वांच्या विकासाबद्दल लिहिलं आहे. संविधानामुळे प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण, आयआयटी, आयआयएम, सार्वजनिक रुग्णालये आहेत. निवडणूक आयोग, सरकारी यंत्रणा आहेत. संविधानात एक व्यक्ती एक मतदान, प्रत्येक जात, धर्म, प्रदेशाचा आदर केला आहे. पण देशात ९० टक्के लोकांवर दररोज अन्याय होत आहे. त्या विरोधात आपली लढाई आहे. हे ९० टक्के लोक जेल, मनरेगा या ठिकाणी दिसतात. हा अन्याय दूर करण्यासाठी जातनिहाय जनगणना गरजेची आहे. जातनिहाय जनगणनेची मागणी होत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींची झोप उडाली आहे असा टोला राहुल गांधींनी लगावला. 

दरम्यान, शेतकर्‍याने कर्ज परतफेड केली नाही तर त्याला जेलमध्ये टाकले जाते आणि करोडो रुपये कर्ज घेऊन जे परदेशात पळून जातात त्याला उद्योगपती म्हणतात असा चिमटाही राहुल गांधींनी केंद्र सरकारला काढला. शिशु मंदिरासाठी एवढा पैसा कुठून येतो, हा पैसा गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, नॅशनल हायवे, अदानी व अंबानीचा पैसा आहे. पाच टक्के लोक देश चालवत आहेत असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. नागपूरात आगमन होताच राहुल गांधी यांनी नागपुरात दिक्षा भूमीला भेट देऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 - RSS and BJP attack on Constitution, its not just book, they are attacking the voice of India - Congress MP Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.