दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसकडून खबरदारी, विदर्भातील आमदारांना विशेष विमानाने सुरक्षित ठिकाणी हलवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 09:18 AM2024-11-22T09:18:25+5:302024-11-22T10:04:54+5:30
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर संभाव्य दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसने विशेष खबरदारी घेतली असून, पक्षाला यशाची सर्वाधिक खात्री असलेल्या विदर्भातील आमदारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी विशेष विमानाची सोय काँग्रेसकडून करण्यात आल्याचं वृत्त आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान आटोपल्यानंतर आता महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी निकालानंतरच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. एक्झिट पोलमधून काहीही अंदाज व्यक्त झाले असले तरी प्रत्येक पक्षाला आपणच सत्तेत येऊ, असा विश्वास आहे. दरम्यान, निकालांनंतर संभाव्य दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसने विशेष खबरदारी घेतली असून, पक्षाला यशाची सर्वाधिक खात्री असलेल्या विदर्भातील आमदारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी विशेष विमानाची सोय काँग्रेसकडून करण्यात आल्याचं वृत्त आहे.
विधानसभा निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर आलेल्या बहुतांश एक्झिट पोलमधून अटीतटीच्या लढतीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे निकाल जाहीर झाल्यानंतर फोडाफोडीचे खेळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काँग्रेसने आधीच सावध पवित्रा घेतला आहे. तसेच विजय मिळण्याची खात्री असलेल्या विदर्भाती आपल्या संभाव्य उमेदवारांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था केली आहे.
काँग्रेसच विदर्भातील बहुतांश जागांवर निवडणूक लढवत असून, येथील जवळपास ३५ जागांवर काँग्रेस विरुद्ध भाजपा अशा लढती होत आहेत. त्यापैकी अनेक जागांवर विजय मिळेल, अशी खात्री काँग्रेसच्या नेत्यांना आहे. तसेच सत्ता स्थापनेतही आपल्या पक्षाची प्रमुख भूमिका राहील, याची जाणीव असल्याने काँग्रेसकडून प्रत्येक पाऊल सावधपणे उचलण्यात येत आहे.
दरम्यान, मतदानासाठी जनतेचा दांडगा उत्साह दिसून आला. महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता महाराष्ट्राच्या हिताचे सरकार निवडेल आणि काँग्रेस पक्ष सर्वांत मोठा पक्ष म्हणून निवडून येईल. महाविकास आघाडीचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. २५ नोव्हेंबरला आघाडीचा नेता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेईल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. तर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल, असा आम्हाला विश्वास असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.