Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : शरद पवार गटाने सात उमेदवारांची चौथी यादी सोमवारी जाहीर केली. आतापर्यंत ८२ उमेदवार घोषित केले आहेत. यापूर्वी पक्षाने काटोल (जि. नागपूर) मतदारसंघातून अनिल देशमुख यांची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, त्यांचा मुलगा सलील देशमुख यांना पक्षाने निवडणूक रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला.
अजित पवार गटात गेलेले माजी आमदार रमेश थोरात यांनी नुकताच शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यांना दौंडमधून उमेदवारी देण्यात आली आहे. थोरात यापूर्वी दौंडमधून निवडून आले होते.
शालिनीताई पाटलांनंतर साताऱ्यात तिसरी महिला उमेदवार : वाई मतदारसंघात अजित पवार गटाचे मकरंद पाटील यांच्याविरोधात शरद पवारांनी माजी आमदार मदन पिसाळ यांच्या पत्नी अरुणादेवी पिसाळ यांना उमेदवारी दिली आहे. इथे उमेदवारीसाठी अनेकजण इच्छुक होते. यात मदन भोसले यांचे पुतणे यशराज भोसले, सून सुरभी भोसले, शिवसेनेतून आलेले पुरुषोत्तम जाधव तसेच डॉ. नितीन सावंत हे इच्छुक होते.
अरुणादेवी या सातारा जिल्ह्यात शालीनीताई पाटील यांच्यानंतर तिसऱ्या महिला उमेदवार आहेत. यापूर्वी कल्पनाराजे भोसले सातारा मतदारसंघातून शिवसेनेकडून, तर शालिनीताई पाटील कोरेगावमधून राष्ट्रवादीकडून विधानसभा लढल्या होत्या.