- मनोज मुळ्ये
रत्नागिरी - याआधी तीन निवडणुकांमध्ये ज्यांच्याशी सामना झाला, त्याच बाळ माने यांच्याशी मंत्री उदय सामंत यांची रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात लढत होत आहे. उद्धवसेना विरुद्ध शिंदेसेना अशा या लढतीत विरोधकांना आपलेसे करुन घेण्याचे जुनेच डावपेच खेळले जाण्याची शक्यता अधिक आहे.
याआधी दोनवेळा (२००४ आणि २००९) उदय सामंत राष्ट्रवादीत असताना भाजपच्या बाळ माने यांच्याशी विधानसभेचा सामना झाला होता. २०१४ मध्ये उदय सामंत (शिवसेना) आणि बाळ माने (भाजप) असा तिसरा सामना झाला. तीनहीवेळा सामंत यांचा विजय झाला. यावेळी सामंत शिंदेसेनेत आणि माने उद्धवसेनेत आहेत. उद्धवसेनेसाठी ही लढाई प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे विरोधी पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आपल्याकडे घेण्याचे डावपेच सुरू झाले आहेत.
पडद्यामागच्या पक्षांतराला अधिक महत्त्वदोनवेळा राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवताना उदय सामंत यांनी विरोधी गटातील लोकांना आपल्याकडे वळवण्यात यश मिळवले होते. यावेळीही उद्धवसेनेतील अनेकजण सामंत यांच्यासोबत जात आहेत. अर्थात पडद्यावरील पक्षांतरापेक्षा पडद्यामागील हालचालींना अधिक महत्त्व आहे.
पडद्यामागची पक्षांतरेउद्धवसेनेकडूनही होण्याची शक्यता आहे. भाजपमधील अनेकजण सामंत यांच्याबाजूला उभे असले तरी ते बाळ माने यांची साथ देण्याचीही शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.