Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाकडून शनिवारी, दि. २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. या यादीत माजी मंत्री सतीश पाटील (एरंडोल) यांच्यासह माजी आमदार राहुल मोटे (परांडा), पांडुरंग बरोरा (शहापूर), दीपिका चव्हाण (बागलाण) यांना संधी देण्यात आली आहे.अजित पवार गटातून आलेल्या सतीश चव्हाण यांना (गंगापूर) आणि दीपक चव्हाण यांना (फलटण) उमेदवारी देण्यात आली आहे. पहिल्या यादीत स्थान न मिळालेल्या आमदार संदीप क्षीरसागर यांना त्यांच्या बीड मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
अजित पवार गटासोबत गेलेल्यांविरोधात शड्डू- राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांविरोधात शरद पवार गटाकडून प्रामुख्याने उमेदवार देण्यात आले आहेत. - येवल्यातून मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात माणिकराव शिंदे, दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात सुनीता चारोस्कर, तर सिन्नर मतदारसंघात माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात उदय सांगळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. - जुन्नरमध्ये अतुल बेनके यांच्या विरोधात विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, अकोलेमध्ये किरण लहामटे यांच्याविरोधात अमित भांगरे, अहिल्यानगर शहरमध्ये संग्राम जगताप यांच्याविरोधात माजी महापौर अभिषेक कळमकर, चंदगडमध्ये राजेश पाटील यांच्याविरोधात बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या नंदिनी भाबुळकर कुपेकर यांना उमेदवारी मिळाली. तसेच उत्तमराव जानकर यांना माळशिरसमधून उमेदवारी मिळाली.
मोटे यांच्या उमेदवारीमुळे मविआत वादाची शक्यता? शरद पवार गटाकडून दुसऱ्या यादीत परांडा मतदारसंघातून माजी आमदार राहुल मोटे यांची उमेदवारी जाहीर केली आहे; परंतु या जागेवर उद्धवसेनेकडून दिवंगत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे चिरंजीव रणजित पाटील यांची उमेदवारी याआधीच जाहीर केली आहे. त्यामुळे परांडा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत पुन्हा वादाची शक्यता आहे.