Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. विधानसभा निवडणूका तोंडावर असताना उद्धव ठाकरे यांनी एक मोठी घोषणा केली होती. यावेळी उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात सत्ता आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे एक मंदिर उभारणार असल्याचे म्हटले होते. यावर भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा मुंब्र्याध्ये मंदिर उभारा असे म्हटले होते. यावरून आता देवेंद्र फडणवीसांचे पूर्वज मुघलांची चाकरी करायचे, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
संजय राऊत यांनी बुधवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी, "काल देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेची चेष्ठा केली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी पु्न्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंब्र्यात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारा. पण आम्ही मुंब्राच काय, पाकिस्तान जाऊनही मंदिर उभारू. मुंब्र्यात शिवाजी महाराजांचा किती मोठा पुतळा आहे हे माहितेय का? मुंब्र्याच्या प्रवेशद्वारातच हा पुतळा आहे. कधी गेलात का मुंब्र्यात? मुंब्र्याच्या प्रवेशद्वाराजवळ महाराजांचा पुतळा मंदिरासारखाच आहे. या देशातील मुस्लिमांना बदनाम करताय. तुम्ही शिवाजी महाराजांचा गैरवापर करताय. तुमचे पूर्वज मुघलांची चाकरी आणि महाराष्ट्राची गद्दारी करत होते, तुमचा इतिहास बघा", असे संजय राऊत म्हणाले.
याचबरोबर, "राज्यात आमचे सरकार आले तर आम्ही शिवाजी महाराजांचं मंदिर उभारू, आमच्यासाठी हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण या राजवटीमध्ये ज्या पद्धतीने छत्रपती शिवरायांचा अपमान झाला. सिंधुदुर्गात महाराजांचा पुतळा भ्रष्टाचारामुळे तुटून पडला. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी दिल्ली दरबारी गहाण ठेवला आहे. म्हणून ते वारंवार दिल्लीला जाऊन झुकत आहेत. त्यासाठी छत्रपतींचे मंदिर आम्ही प्रत्येक जिल्ह्यात उभारू, असे उद्धव ठाकरे सांगत आहे आणि त्यावर लोक प्रतिसाद देत आहे. मात्र यामुळे विरोधकांच्या पोटात दुखणे हे स्वाभाविक आहे", असेही संजय राऊत म्हणाले.
शरद पवारांच्या निवृत्तीच्या संकेतावर संजय राऊत काय म्हणाले?शरद पवार यांनी राजकारणातून निवत्तीचे संकेत दिल्याबाबत संजय राऊत यांना विचारण्यात आले. यावेळी संजय राऊत म्हणाले की, शरद पवार हे संसदीय राजकारणातले भीष्म पितामह आहेत. गेल्या ६० वर्षापासून ते राजकारणात कार्यरत आहेत. विधानसभा, लोकसभा, विधान परिषद, राज्यसभा अशा सर्व संसदीय सभागृबहात त्यांना काम केल्याचा अनुभव आहे. केंद्रीय मंत्रीपासून ते विविध पदांवर त्यांनी काम केले आहे.त्यांच्या इतका अनुभव असलेला नेता राजकारणात नाही. मात्र, गेल्या काही काळापासून त्यांच्या मनात असा विचार येत आहे. माझ्याकडेही दिल्लीत असताना त्यांनी हा विषय बोलून दाखवला होता. त्यावेळी आम्ही त्यांना असा विचारही मनात आणू नका असे सांगितले होते. वय हा विषय नसून अनुभव हा विषय आहे. आमच्यासाठी त्यांनी राजकारणात असणे हे मार्गदर्शक आणि दीपस्तंभाप्रमाणे आहे. त्यांनी पुन्हा एकदा जाहीरपणे हा विषय बोलून दाखवला. पवार साहेबांचा प्रदीर्घ अनुभव या क्षेत्रामध्ये आहे त्याचा फायदा महाराष्ट्राला, देशाला आणि राजकीय क्षेत्रात नव्याने येणाऱ्यांना होत असतो, असे संजय राऊत म्हटले.