राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच सत्तास्थापनेसाठी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यात मुख्यमंत्रिपदावरून महाविकास आघाडीमध्ये खटके उडताना दिसत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल, असा दावा केल्यानंतर ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेवरून आता नाना पटोले यांनी संजय राऊत यांना खोचक टोला लगावला आहे.
संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, संजय राऊत हे हायकमांड आहेत. त्यांच्यावर प्रतिक्रिया देणे हे काही बरोबर नाही. नाना पटोले यांनी केलेल्या या टीकेमुळे निकालांपूर्वीच संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यातील वाद पुन्हा एकदा भडकण्याची शक्यता आहे.
दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल, असा दावा केला होता. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेत नाना पटोले यांच्यावर टीका केली होती. तसेस महाविकास आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर मित्रपक्षाचे नेते एकत्र येऊन मुख्यमंत्रिपदावर चर्चा करतील, असं संजय राऊत यांनी सांगितलं. तसेच जर काँग्रेस हायकमांडने नाना पटोले यांना ते मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील, असं सांगितलं असेल तर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, वरिष्ठ नेते राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांनी त्याची घोषणा केली पाहिजे, असेही संजय राऊत म्हणाले होते.