Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुरुवात झाली तर अद्यापही महाविकास आघाडीमध्ये अजूनही जागावाटपाच्या चर्चा सुरु आहेत. महाविकास आघाडीमध्ये जागांच्या वाटपांवरुन रोज खलबतं सुरु असून एकमत होताना दिसत नाहीये. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेत तिन्ही पक्षांमध्ये ८५-८५-८५ असा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती दिली. त्यानंतर ठाकरे गटाने बुधवारी ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. दुसरीकडे आता काँग्रेसला १०० ते १०५ च्या दरम्यान जागा मिळतील असे विधान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. वडेट्टीवारांच्या या विधानावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ते खूप विद्वान असल्याचे म्हटलं आहे.
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपावरून महाविकास आघाडी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. निम्म्यापेक्षा जास्त जागांवरील तिढा सुटल्यानंतर तिन्ही पक्षांमध्ये ८५-८५-८५ असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली. तसेच २७० जागांवर सहमती झाली असून बाकी १५ जागांवर लवकरच निर्णय होईल, असे म्हटलं आहे. याबाबत बोलताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आम्ही आकड्यावर नाही तर मेरिटवर जागा वाटप केल्याचे म्हटलं आहे. तसेच काँग्रेसला १०० पेक्षा अधिक जागा मिळू शकतील असेही वडेट्टीवार म्हणाले. वडेट्टीवारांच्या दाव्यावर संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
" विजय वडेट्टीवार हे खूप विद्वान, हुशार गृहस्थ आहेत. ते विरोधी पक्षनेते असून अनेक काळ त्यांनी शिवसेनेमध्येही काम केलं आहे. विजय वडेट्टीवार हे मेरिटवर बोलत आहेत तर त्यांचे स्वागत आहे," असं संजय राऊत म्हणाले.
काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
विजय वडेट्टीवार यांना काँग्रेस पक्ष १०५ जागा लढवणार आहे का? असा सवाल विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, "निश्चितच काँग्रेसचा वाटा त्यामध्ये अधिकचा राहील आणि साधारणत: १०० ते १०५ च्या दरम्यान जागा काँग्रेसला मिळतील असे आम्हाला एकंदरीत चर्चेमध्ये दिसते आहे. पण आकडा १०० असावा १२० असावा यापेक्षा संख्याबळ किंवा किती अधिक जागा पदरात पाडून घेण्यापेक्षा मेरिटवर जागावाटप हा महत्त्वाचा मुद्दा होता."