नागपूर - नागपूर विभागात ठाकरे गटाला १ जागा मिळाली त्यावरून नाराजी असेल तर तो त्यांचा व्यक्तिगत मत आहे. आम्हाला कोकणात काहीच मिळालं नाही असं आम्ही म्हणायचं का? संजय राऊतांनी हा विषय बंद केला पाहिजे, आपल्याला विरोधकांच्या विरोधात लढायचं आहे ही भूमिका आपण घेतली पाहिजे. संजय राऊतांनी आता आपली तोफ विरोधकांकडे डागली पाहिजे हा माझा प्रेमाचा सल्ला आहे असं विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊतांबाबत केले आहे.
पत्रकार परिषदेत नाना पटोले म्हणाले की, सोलापूर दक्षिणबाबत आमच्या हायकमांडने घेतलेला निर्णय आहे. त्याबाबतीत चर्चा होईल. राज्य म्हणून त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. तिकिट वाटपानंतर काही नाराज होतील. हा प्रक्रियेचा भाग आहे. महाराष्ट्र मोठा आहे. ३ पक्षांची आघाडी आहे. मित्रपक्ष आहेत. त्यामुळे काही जिल्ह्यात एखाद्या पक्षाला जागा मिळणार नाहीत. जवळपास १०-१२ जिल्ह्यात आम्ही उमेदवार दिले नाहीत. संघटना हा महत्त्वाचा भाग आहे. परंतु महाराष्ट्र वाचवणे हे दायित्व जास्त आहे. महाराष्ट्र महायुतीच्या हातात गेला तर पूर्ण महाराष्ट्र विकून गुजरातचं नियंत्रण महाराष्ट्रावर आले असं होईल असं त्यांनी सांगितले.
तसेच राष्ट्रीय पक्ष असतील मग भाजपा असो वा काँग्रेस..त्यांना मित्रपक्षांना सांभाळणे ही राष्ट्रीय पक्षाची जबाबदारी असते. कार्यकर्त्यांच्या वेदना माहिती आहेत. आघाडी महत्त्वाची असते. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना ताकद मिळायला हवी. या युती सरकारने या विचारांना गाडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अपमानित करणे. या लोकांची मानसिकता पाहा. महिलांचा अपमान करणे ही भाजपाची मानसिकता आहे. ते अहिल्यानगरमध्ये दिसले. महाराष्ट्र वाचवणे, शेतकरी, तरुण आणि गरीबाला न्याय देणे, राज्यात कर वाढवले आहेत ते कमी करणे हा आमचा उद्देश आहे. त्यामुळे ही लढाई काँग्रेस लढतेय. ही वेळ महाराष्ट्राला वाचवण्याची आहे. एकत्रित येऊन मविआला निवडून द्यावं असं आवाहन नाना पटोलेंनी कार्यकर्त्यांना केले.
दरम्यान, सांगलीसारखा पॅटर्न कुठे होऊ नये असा आमचा प्रयत्न आहे. काही जागांचा वाद आहे तो उद्यापर्यंत संपेल. सगळ्या समाजाला संधी मिळावी यासाठी काँग्रेसचा प्रयत्न झालेला आहे. पक्ष संघटना असो वा सत्तेत सर्व समाजाला न्याय कसा देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. महाराष्ट्राची संस्कृती भाजपाने खराब करण्याचं पाप केले आहे. मराठा विरुद्ध ओबीसी, धनगर विरुद्ध आदिवासी ही फूट निर्माण करून सामाजिक तेढ निर्माण केला आहे. जातीय जनगणना करून या सर्व प्रवाहांना मुख्य प्रवाहात कसं आणता येईल ही भूमिका आमची आहे असं नाना पटोलेंनी सांगितले आहे.