मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 10:40 AM2024-09-23T10:40:07+5:302024-09-23T11:00:32+5:30
Maharashtra assembly Election 2024: नागपूरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या एका कार्यक्रमात काँग्रेसच्या विदर्भातील नेत्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोले (Nana Patole) यांचं नाव आक्रमकपणे पुढे आणण्याचा प्रयत्न केला. त्यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काँग्रेसच्या नेत्यांना टोला लगावला आहे.
विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असताना राज्यात मुख्य विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलेल्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागावाटप आणि मुख्यमंत्रिपदावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान, नागपूरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या एका कार्यक्रमात काँग्रेसच्या विदर्भातील नेत्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोले यांचं नाव आक्रमकपणे पुढे आणण्याचा प्रयत्न केला. त्यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसच्या नेत्यांना टोला लगावला आहे.
नाना पटोले यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत काँग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या मागणीबाबत प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, काँग्रेस पक्षामध्ये अशी काही भूमिका असेल, तर त्यासंदर्भात त्यांचे जे हायकमांड आहेत, मग राहुल गांधी असलीत, मल्लिकार्जुन खर्गे असतील, तर ते त्यावर निर्णय घेतील. मुख्यमंत्रिपद हिसकावून घेऊ असं, काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणत असतील तर ते नाना पटोले यांच्या प्रतिमेचं नुकसान करणारं ठरेल, असं मला वाटतं.
संजय राऊत पुढे म्हणाले की, आघाडीमध्ये कुणी काही बोलेल. उद्धव ठाकरे यांनी पक्षाचा, आघाडीचा चेहरा निश्चितपणे ठरवला गेला पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. जर काँग्रेस पक्ष असा चेहरा देणार असेल, तर आम्ही त्याचं स्वागत करू. आम्ही त्याचं समर्थन करू, ही उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. आम्ही शिवसेनेला मुख्यमंत्रिपद दिलं नाही तर हिसकावून घेऊ किंवा राष्ट्रवादीला दिलं नाही तर हिसकावून घेऊ असं म्हणत नाही आहोत. त्यामुळे ज्या नेत्याच्या संदर्भात असं वक्तव्य केलं जातं. त्या नेत्याला अशी वक्तव्य अडचणीची ठरू शकतात, असा सूचक इशारा संजय राऊत यांनी दिला.
नाना पटोले हे काँग्रेसचे अत्यंत संयमी नेते आहेत. निस्वार्थी नेते आहेत. ते पक्षाच्या विजयासाठी अथक परिश्रम करताहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी त्यांना अडचणीत आणण्याचं काम करू नये, असा सल्लाही संजय राऊत यांनी नाना पटोले यांच्या काँग्रेसमधील समर्थकांना दिला आहे.