Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. आचारसंहिता लागू होताच राज्यातील राजकारणाला वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांचे जागावाटप जवळपास अंतिम होत आहेत. तसेच मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरूनही महायुती आणि महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. यातच जयंत पाटील यांच्यासंदर्भात शरद पवार यांनी केलेल्या विधानावर शिंदे गटातील नेत्याने प्रतिक्रिया देताना टीका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेचा समारोप इस्लापुरात झाला. या सभेत जयंत पाटील भाषणाला उभे राहिले, तेव्हा उपस्थितांनी त्यांच्या नावाने मुख्यमंत्रिपदाच्या घोषणा दिल्या गेल्या होत्या. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक संकेत दिले होते. आजच्या पिढीच्या जयंतरावसारख्या नेतृत्वाने उद्याचा महाराष्ट्र घडवण्याच्यासाठी, सावरण्यासाठी भूमिका आपल्या खांद्यावर घ्यावी. ही तुमची, माझी आणि संपूर्ण महाराष्ट्राची अपेक्षा आहे. त्या अपेक्षेच्या पूर्ततेला तुम्हा सगळ्यांची शक्ती असेल. मी एवढेच सांगतो. पक्षाचा प्रमुख म्हणून सांगतो. देशाचा पक्षाचा प्रमुख म्हणून सांगतो की, उद्याचा महाराष्ट्र सावरण्यासाठी आणि उद्याचा प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी मोलाची कामगिरी याच परिसरातून होणार आहे, याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही, असे विधान शरद पवार यांनी केले. यावर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी टीका केली.
जयंत पाटील अन्य कुठे जाऊ नये म्हणून शरद पवार तसे म्हणाले असतील
जयंत पाटील यांच्यावर जबाबदारी का दिली यामागील इतिहास शरद पवार यांना चांगलाच माहिती आहे. जयंत पाटील आता हलू नयेत, ते गोड बोलून काय करतील याचा नेम नाही म्हणून बोलले असतील. जयंत पाटील यांची जी काही घुसमट होत होती, रोहित पवार यांच्या सारखे मोठे नेते उदयास आल्यानंतर जयंत पाटील यांना जो काही दाबण्याचा प्रयत्न केला होता ती चूक त्यांच्या लक्षात आल्याने ही जबाबदारी टाकली आणि रोहित पवारांना सांगितले की च्विंगम घे आणि तोंडातच चघळत बस, अशी टोलेबाजी संजय शिरसाट यांनी केली.
दरम्यान, न्यायदेवतेच्या नवीन मूर्तीवरून संजय राऊतांनी टीका केली होती. या टीकेचा समाचार संजय शिरसाट यांनी घेतला. न्यायदेवतेच्या हातात संविधान दिले ही अभिमानाची गोष्ट आहे. तलवारीने नाही तर घटनेने हे राज्य चालणार आहे. राहुल गांधी जाहीर सभेमध्ये घटनेचे पुस्तक हातात घेऊन हलवतात, त्या घटनेचा अपमान करणे तुम्ही बंद करा. तुमच्या कृतीमुळे लोक तुम्हाला कार्टून समजतात विद्यावान समजत नाहीत. संजय राऊत यांनी फक्त राहुल गांधी यांच्याकडे जाऊन त्यांना सल्ला द्यावा. सर्वोच्च न्यायालय आपले काम व्यवस्थित करत आहे, असे संजय शिरसाट म्हणाले.