- मविआच्या जागांचा फॉर्म्युला दोन दिवसांत जाहीर होणार; महायुतीतील पक्षांची अमित शाह यांच्याशी सकारात्मक चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: काँग्रेस आणि उद्धवसेनेत निर्माण झालेल्या वादामुळे थांबलेली महाविकास आघाडीची जागावाटपाची चर्चा शनिवारी पुन्हा सुरू झाली. आता मविआत १५ जागांचा तिढा अद्याप कायम आहे, मविआबरोबर असलेल्या लहान पक्षांना किती जागा सोडायच्या याबाबत बैठकीत खलबते झाल्याचे समजते. हा तिढा सोडवून दोन दिवसांत जागावाटप जाहीर होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
शेकाप, माकप, भाकप, सपा या पक्षांना जवळपास २५च्या घरात जागा हव्या आहेत. सपाने तर पाच जागांपेक्षा कमी जागा नको अशी भूमिका घेतली आहे. त्याबाबत काय करायचे यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.२८ जागांवर दोनपेक्षा जास्त पक्षांनी दावा सांगितला आहे. गरज पडल्यास काँग्रेस अध्यक्ष मलिकार्जुन खरगे, शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे चर्चा करून अंतिम निर्णय घेतील.
चेन्नीथला यांनी घेतली ठाकरेंची भेट
- महाविकास आघाडीतील जागावाटपावरून काँग्रेस आणि उद्धवसेनेत निर्माण झालेले वादळ शनिवारी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीनंतर शमले आहे.- काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत दोन पक्षांत निर्माण झालेल्या वादावर चर्चा होऊन त्यावर पडदा टाकून यापुढे सामंजस्याने निवडणुकीला सामोरे जाण्याचे ठरले.
मविआची तब्येत चांगली
उद्धव ठाकरे नुकतेच आपली नियमित तपासणी करण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. मात्र, आता त्यांची प्रकृती चांगली आहे. त्यांच्यासोबतच महाविकास आघाडीची प्रकृतीही चांगली असल्याचे चेन्नीथलांनी सांगितले.
महायुतीचेही ठरले; पण २०-२५ जागांचा अपवाद
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली / मुंबई: महायुतीच्या जागावाटपासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शुक्रवारी रात्री नवी दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. सुमारे अडीच तास झालेल्या या बैठकीत २० ते २५ जागांचा अपवाद वगळता उर्वरित जागांच्या वाटपाचा फॉर्म्युला अंतिम झाला असून, तीनही नेत्यांनी त्यावर शिक्कामोर्तब केल्याचे समजते. शनिवारी राज्यात परतल्यावर दिल्लीतील बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून, येत्या दोन-तीन दिवसांत जागावाटप जाहीर करण्यात येईल, असा विश्वास तिघांनी व्यक्त केला.
जागावाटपाबाबत दिल्लीत अमित शाह यांच्यासमवेत आमची बैठक होवून सकारात्मक चर्चा झाली. लवकरच आम्ही संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जागावाटप जाहीर करू, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
पहिली यादी लवकरच
महायुतीची जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. भाजपची पहिली यादी कधीही म्हणजे लवकरच येऊ शकते, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात सांगितले. फडणवीस हे शनिवारी सायंकाळी दिल्लीवरून नागपूरला परतले. ते म्हणाले, क्लिअर झालेल्या जागांची त्या-त्या पक्षाने आपापल्या सोयीने घोषणा करावी.
जागांचा तिढा सोडवू...
जागावाटपाबाबत अमित शाह यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून, एक-दोन दिवसात जागावाटप पूर्ण होईल. आता २० ते २५ जागांचे वाटप राहिले आहे. त्यातही तिढा नाही. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री