Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल येण्याआधीच महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेंच सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्रीबाबत केलेल्या दाव्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांना टोला लगावला होता. पुढील मुख्यमंत्री काँग्रेसचा असेल हे मी मानत नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता काँग्रेसच्या बड्या नेत्याने नाना पटोले यांना झापलं आहे. संयम बाळगण्याची गरज असल्याचे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने म्हटलं आहे.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी १७० ते १७५ जागा जिंकेल असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. तसेच काँग्रेसच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार बनेल असं विधान केल्यानं मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे असेल असे सुतोवाच नाना पटोले यांनी दिले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि छत्तीसगडचे माजी उपमुख्यमंत्री टी.एस. सिंग देव यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत असल्याचा दावा केला आहे. "आपण संयम बाळगला पाहिजे. सध्या कोणाचे सरकार बनणार आहे हे देखील आपल्याला माहित नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मी महाराष्ट्रात होतो आणि माझ्या माहितीनुसार ठोस आशा आहे की महाविकास आघाडीचे सरकार येईल. पण आधी सरकार तर स्थापन होऊ द्या," असं टी.एस. सिंग देव यांनी म्हटलं आहे.
"महाविकास आघाडीने सर्व काम एकत्र केले आहे. निवडणूक लढण्याचे, जागा वाटपाचे, जाहिरनाम्याचे सर्व निर्णय एकत्र घेतले आहेत. पुरंदर विधानसभा मतदारसंघात काम करताना मी पाहिलं की सगळ्या घटक पक्षाचे कार्यकर्ते मिळून काम करत होते. पुणे आणि इतरही मतदारसंघात सर्वांनी मिळून काम केलं आहे. त्यामुळे निवडणुकीचे निकाल आले की महाविकास आघाडीती घटक पक्षांनी एकत्र बसावे आणि प्रत्येक पक्षाच्या हायकमांडने एकत्रितपणे निर्णय घ्यावा," असंही सिंग म्हणाले.
काय म्हणाले संजय राऊत?
"पुढील मुख्यमंत्री काँग्रेसचा असेल हे मी मानत नाही. महाविकास आघाडीचं सरकार असेल आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ. जर नाना पटोले असं म्हणत असतील, पटोलेंना जर हायकमांडने सांगितले असेल तुम्ही मुख्यमंत्री बनणार आहात तर राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी जाहीर करायला हवं," असा टोला संजय राऊतांनी लगावला.