भाजपाच्या माजी नेत्या आणि शिवसेना शिंदे गटाच्या मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार शायना एनसी यांनी दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अरविंद सावंत यांनी आपला उल्लेख इंपोर्टेड माल असा केल्याचा आरोप शायना एनसी यांनी केला आहे. दरम्यान, माझं विधान शायना एनसी यांनी चुकीच्या पद्धतीने मांडल्याचा दावा अरविंद सावंत यांनी केला आहे.
मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमीन पटेल यांचा प्रचार करत असताना अरविंद सावंत यांनी शायना एनसी यांच्यावर टीका केली होती. येथे इंपोर्टेड माल चालत नाही. आमच्याकडे इंपोर्टेड माल चालत नाही, ओरिजनल माल चाललो, असं विधान अरविंद सावंत यांनी केलं होतं. त्यावर टीका करताना शायना एनसी म्हणाल्या की, हे महिलांकडे केवळ माल म्हणून पाहतात. एक सक्षम महिला, व्यावसायिक महिला जी स्वत: च्या हिमतीवर २० वर्षांपासून राजकारण करत आहे. तिच्यासाठी तुम्ही ‘माल’ सारख्या शब्दाचा वापर करता. त्यामधून तुमची मानसिक स्थिती काय आहे हे सर्वांना समजून येतं. महाराष्ट्रातील महिला ठाकरे गटाला कधीही मतदान करणार नाहीत. महिलांचा सन्मान ठेवला, तर तुमचा आदर केला जाईल. तुम्ही महिलांना माल म्हटलं तुमचे काय हाल होणार ते २० तारखेला बघा, असा इशारा शायना एनसी यांनी दिला.
दरम्यान, त्या विधानावर स्पष्टीकरण देताना अरविंद सावंत म्हणाले की, मागच्या ५० वर्षांच्या कारकिर्दीत स्त्रियांचां माझ्याइतका बहुमान करणारा माणूस मिळणार नाही. मी कधीही कुणाला अवमानकारक शब्द वापरत नाही. राहिला प्रश्न त्या विधानाबाबतचा तर ते हिंदीमधील वक्तव्य आहे. माल शब्दाला इंग्रजीत गुड्स म्हणतात. मराठीत योग्य तो शब्द तुम्ही वापरू शकता. शायना एनसी ह्या माझ्या जुन्या मैत्रिण आहेत. त्या काही माझ्या शत्रू नाहीत. पण त्यांना हे नरेटिव्ह सेट करायला कुणी शिकवलंय हा प्रश्न आहे. हे विधान मी फॉर्म भरल्यानंतर दोन दिवसांनी बोललो होते. मात्र त्यांना हे आता आठवलं का? असा सवाल अरविंद सावंत यांनी विचारला.
मी कधी कुठल्या महिलेचा अपमान केलेला नाही करणारही नाही. राहिला प्रश्न तर मी त्यांना काही म्हटलेलं नाही नाही तर माझा उमेदवारालाही हा ओरिजनल माल आहे, असे बोललो आहे. त्यामुळे ती चित्रफीत पूर्ण पाहा, अर्धवट पाहू नका. त्यामुळे माल या शब्दाचा चुकीचा अर्थ घेऊन विपर्यास करण्याचा प्रयत्न त्या करत आहेत. तो त्यांचा प्रयत्न अयशस्वी होईल, असेही अरविंद सावंत म्हणाले.