एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत झालेल्या बंडावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले नेते आणि आमदारांविरोधात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक आघाडी उघडली आहे. विधानसभा निवडणुकीत शिंदेंना साथ देणारे नेते ज्या ज्या मतदारसंघांतून निवडणूक लढवत आहेत. तिथे जाऊन उद्धव ठाकरे त्यांच्यावर बोचरी टीका करत आहेत. दरम्यान, आज पाटण येथे झालेल्या सभेमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार करताना उद्धव ठाकरे यांनी येथील शिंदे गटाचे उमेदवार शंभूराज देसाई यांच्यावर अगदी बोचऱ्या शब्दात टीका केली होती. या टीकेमुळे शंभुराज देसाई कमालीचे संतप्त झाले असून, त्यांनीही उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना शंभुराज देसाई म्हणाले की, मी माझी पत्नी प्राप्तिकर भरतो, त्यामुळे कुठल्याही आणि कसल्याही चौकशीला सामोरं जाण्यास मी तयार आहे. विकासकामांवर बोलण्याचा मुद्दा उद्धव ठाकरे यांच्याकडे नाही. मी मुख्यमंत्री झाल्यावर राज्याला कुठलं व्हिजन देईन. ज्या पाटणमध्ये प्रचाराला आलात, त्या मतदासंघासाठी काय योजना आहेत, याबाबत उद्धव ठाकरे काही बोलले का? माझ्या मुलाचं लग्न काढलं. मला लुटमार मंत्री म्हणाले. याचा अर्थ पक्षाचं धोरण त्यांच्याकडे नाही. मतदारसंघाच्या विकासाचं धोरण त्यांच्याकडे नाही. सरकार आलं तर काय करेन हेही ते बोलत नाहीत. त्यामुळे ज्यांच्या पायाखालची वाळू सरकरी आहे. तसेच त्यांच्या सभेला जो अतिप्रचंड जनसमुदाय होता, तो पाहून त्यांनी कदाचित अशा प्रकारी टीका केली असेल, असा टोला शंभुराज देसाई यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले की, माझ्या आजोबांच्या राजकीय जीवनावर भाष्य करण्याइतपत उद्धव ठाकरे हे मोठे आहेत असं मला वाटत नाही. माझ्या आजोबांचे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे काय संबंध होते, याबाबत बाळासाहेबांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे. दिवंगत बाळासाहेब देसाई हे काँग्रेसमधून मंत्री झाले होते, हे सत्य आहे. परंतु पुढे काँग्रेसकडून आमच्या कुटुंबावर जो राजकीय अन्याय झाला, त्यामुळे आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागली. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी मला शिवसेनेत घेतलं होतं. मनोहर जोशी हे त्याचे साक्षीदार होते. आम्ही आजही बाळासाहेब ठाकरे यांच्या त्याच शिवसेनेत आहोत आणि धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवत आहोत. आम्ही बाळासाहेबांचे आणि हिंदुत्वाचे विचार कधीही सोडलेले नाहीत, असेही शंभुराज देसाई यांनी सांगितले.दरम्यान, शंभूराज देसाई यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, हे आता खूप झालं. गद्दारी, गद्दारी किती गद्दारी, पाटणशी गद्दारी. मला नेमकं कळतच नाही की, कुणी म्हणतंय, उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना काँग्रेससोबत गेली म्हणून आम्ही गद्दारी केली. इथले जे लुटमार मंत्री आहेत त्यांना विचारतोय की, तुमचे आजोबा काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसमध्ये काय झालं ते तेव्हा तुम्हा दिसलं नाही काय? पुढे काँग्रेसमध्ये यांना कुणी विचारेना. म्हणून हे शिवसेनेमध्ये घुसले. आपल्यालाही दया आली. बाळासाहेब देसाई आणि शिवसेनाप्रमुखांचे ऋणाणुबंध तेव्हा होते म्हणून यांना पक्षात घेतलं. पण हा असा लुटमार करणारा करंटा असेल असं आपल्याला वाटलं नव्हतं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
शंभुराज देसाईंवर टीका करताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले होते की, आपण मंत्री केला. पण शिंदेंनी सांगितलं की, गद्दारी झाली तेव्हा हाच लांडगा पुढे होता. तुम्हाला शिवसेना म्हणजे गांडुळांची औलाद आहे, असं वाटतं का? जो करणार मला मंत्री त्याचा मी वाजंत्री. बस वाजंत्री वाजवत. इथे तीन उमेदवार आहेत. त्यातील लुटमार मंत्र्यांनी आपल्याकडचं खातं घरच्या लग्नासाठी वापरलं. मी सुद्धा अडीच वर्षे मुख्यमंत्री होतो. त्यामुळे आमचेही प्रशासकीय विभागात संबंध आहेत. त्यामुळे कुठे कुठे पैसे गेले हे सांगत असतात. जरा थांबा, आपली सत्ता आल्यावर सगळी प्रकरणं कशी मार्गी लावतो ती बघा, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला होता.