एकीकडे महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांमधील जागावाटपाच्या चर्चांचं गुऱ्हाळ संपण्याचं नाव घेत नसताना दुसरीकडे सत्ताधारी महायुतीमधील तिन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात लोकसभा निवडणुकीनंतर काहीशा बॅकफूटवर गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानेही आपल्या ३८ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात सिन्नर विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाकडून माणिकराव कोकाटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी थेट शरद पवार यांनाच आव्हान दिले आहे. माझ्या मतदारसंघामध्ये शरद पवार फॅक्टर चालणार नाही, असं विधान त्यांनी केलं आहे.
सिन्नरमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना माणिकराव कोकाटे म्हणाले की, माझा मतदारसंघ अत्यंत हुशार आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाही. परंतु शरद पवार हे दिल्लीमध्ये असतात आणि माझ्या मतदारसंघातील प्रश्न हे राज्यातील आहेत. मला राज्यातले प्रश्न सोडवण्यासाठी राज्यातला नेता हवा आहे. सध्या अजित पवारांएवढा सक्षम नेता प्रश्न सोडवण्यासाठी आहे, असं मला वाटत नाही. म्हणून मी जाणीवपूर्वक अजित पवार यांच्या पाठीशी उभा राहिलो आहे. शरद पवार यांना मानणारे लोकही माझ्यासोबत येतील आणि विकासासाठी, याची खात्री आणि विश्वास मला आहे, असे माणिकराव कोकाटे म्हणाले.
यावेळी माणिकराव कोकाटे यांनी जातीपातीच्या राजकारणावरही टीका केली. ते म्हणाले की, ओबीसी, जात, धर्म, पैसा, या सर्व गोष्टी बोलण्यासाठी आहेत. काही संबंध नाही. मी स्वत: ओबीसी आहे. त्यामुळे ओबीसी, मराठा, इतर अल्पसंख्याक याचं कल्याण करणारे, असं कुणी कुणाचं कल्याण करत नाही. कुठलीही योजना आणली की ती संपूर्ण समाजासाठी असते. कुठल्याही एका समाजासाठी असत नाही असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, सिन्नरमध्ये माझ्यासमोर कुणाचंही आव्हान नाही आहे. सिन्नर तालुक्यात झालेला विकास, होणारा विकास, विकासाच्या बाबतीत असलेल्या अपेक्षा कोण आणि कशा पूर्ण करू शकतो, हे सिन्नर तालुक्यातील जनतेला माहित आहे. त्यामुळे येथील निवडणूक फारशी अवघड आहे, असं मला वाटत नाही. मात्र निवडणुकीची एक प्रक्रिया असते त्यानुसार निवडणूक लढवावी लागणार आहे, असेही माणिकराव कोकाटे म्हणाले.