Sharad Pawar Rohit Patil Sanjay kaka Patil News: तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात रोहित पाटील विरुद्ध संजयकाका पाटील यांच्यात लढत होत आहे. रोहित पाटलांच्या प्रचारार्थ शरद पवारांची शुक्रवारी सभा झाली. या सभेत बोलताना शरद पवारांनीसंजयकाका पाटील यांच्या पक्षांतराचा इतिहास सांगत हल्ला चढवला.
प्रचारसभेत बोलताना शरद पवार म्हणाले, "इथले माजी खासदार, त्यांची माहिती आहे मला. अनेक गोष्टी सांगता येतील. महाराष्ट्राची पहिली विधान परिषद मला आठवतेय. एके दिवशी माझ्याकडे आर आर पाटील आले. त्यांनी सांगितलं की, 'साहेब विधान परिषदेच्या जागा भरायच्या आहेत आणि एका जागेसाठी माझा आग्रह आहे."
संजय पाटलांसाठी आर आर पाटलांनी धरला आग्रह
"मी म्हटलं कुणाचा? त्यांनी सांगितलं, 'संजय पाटलांचा.' मी म्हटलं मला पसंत नाही. तुम्ही दुसरं नाव सांगा. ते म्हणाले, 'नाही. नाही. माझा फार आग्रह आहे. मी त्यांच्याशी बोललोय. काही करा आणि त्यांना द्या.' मी म्हटलं यांचा काही भरोसा नाही. हे तुमच्याबरोबर राहतील याची खात्री नाही. कशासाठी तुम्ही आग्रह करता?", असा किस्सा पवारांनी सभेत सांगितला.
"आमदारकी संपली आणि दुसऱ्या दिवशी भाजपात गेले"
"आर आर पाटील म्हणाले, 'नाही माझ्या भागातील आहे. काही करा, पण एवढं माझं ऐका.' शेवटी आर आरचं नाव आहे. शेवटी ते मी मान्य केलं. ते (संजयकाका पाटील) आमदार झाले. सहा वर्ष झाली. मोठी गंमतीची गोष्ट आहे, ज्या दिवशी आमदारकीचा काळ संपला. दुसऱ्या दिवशी भाजपमध्ये गेले", असे शरद पवार यांनी सांगितले.
"भाजपमध्ये गेले. लोकसभा लढवली. त्यांना यश मिळालं. दहा वर्ष लोकसभेत राहिले. मी जाता-येता चौकशी करायचो. मतदारसंघात काय चाललंय. हा गडी मतदारसंघातील प्रश्नाची कधी चर्चाही करत नाही. इथे विचारल्यानंतर तेच ऐकायला यायचं. दहा वर्ष काढली. खासदारकी संपली आता नवीन पक्ष. ते नवीन पक्षात गेले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात, त्यानंतर पुन्हा एकदा निवडणूक आली", असे म्हणत शरद पवारांनी संजयकाका पाटील यांच्यावर टीका केली.
"मला म्हणाले, काळजी करू नका आपलंच सगळंं आहे"
"निवडणुकीच्या एक महिन्या आधी मी सांगलीला आलो होतो. आणि त्यांनी एक काहीतरी कार्यक्रम घेतला होता. मला अतिशय आग्रहाने सांगितलं की, तुम्ही यायलाच पाहिजे. समाजाच्या लोकांचा प्रश्न आहे. शेवटी मी गेलो त्या कार्यक्रमाला सांगलीमध्ये कार्यक्रम होता. मी त्यांना विचारलं. उद्याच्या निवडणुकीमध्ये कसं चित्र दिसेल. ते म्हणाले, 'काही काळजी करू नका. आपलंच सगळं आहे. काँग्रेस असेल, उद्धव ठाकरे असेल, राष्ट्रवादी असेल, याच्याशिवाय दुसरं काही नाही.', अशी चर्चा झाल्याचंही पवारांनी सभेत सांगितलं.
"मी म्हटलं तुमचं काय आहे? म्हणे आमचं या सगळ्यांना निवडून आणण्यासाठी ताकद लावणं यापेक्षा दुसरी काही माझी अपेक्षा नाही. आणि आठ दिवसांनी वाचलं, या मतदारसंघात अर्ज भरला. सगळं ठीक आहे. काम करण्याची संधी लोकांनी दिली. त्या संधीचं सोनं करण्याची भूमिका नाही. कारखाना उभा केला, त्या कारखान्याची काय अवस्था आहे? मी त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही", असा इशाराही पवारांनी दिला.