मुंबई- अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस असून त्यांनी कधीही ओबीसी, एसटी आणि एससी यांना निधी दिला नाही. जिथे फायदा तिथे पैसे फिरवायचे. त्यातून टक्केवारी मिळायची असा गंभीर आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, अजित पवारांनी २०० कोटींचा हिशोब द्यावा, हा माणूस किती खडूस आहे. मला का नाही दिले? मी त्यांच्याच पक्षातील आमदार होतो मग मला का निधी दिला नाही. आयुष्यभर माझं वाईट चिंतणारे कोण होते तर ते अजित पवार होते. अतिशय खुनशी आणि जातीयवादी माणूस आहे. अर्थसंकल्पात कायम अजित पवारांनी ओबीसी, एससी आणि एसटी यांच्या निधीत कपात केली आहे. कुणालाही विचारा. अजित पवार अर्थमंत्री असतानाही इतिहास काढा. प्रचंड जातीवादी माणूस आहे असा आरोप त्यांनी केला.
तसेच मी अनुभवावरून सांगतोय, अजित पवार मंत्रिमंडळात असताना के.सी पाडवी यांना ज्या पद्धतीने वागवायचे, हे पाहून माझ्या डोळ्यात अश्रू यायचे. के.सी पाडवी महाराष्ट्रातला एकटा भ्रष्टाचारी आणि हा आरोप यांनीच लावायचा. अजित पवार धुतल्या तांदळासारखे स्वच्छ असल्यासारखे वागायचे. अर्थसंकल्पात प्रत्येक समाजासाठी तरतूद असते मात्र जेव्हा काटकसरीची वेळ येते तेव्हा ओबीसी, एससी, एसटी समाजाच्या निधी कापला जायचा. जिथे यांचा फायदा तिथे पैसे फिरवले जायचे. समाज यांच्यासाठी महत्त्वाचा नाही. यांना समाजापेक्षा विकास महत्त्वाचा वाटतो कारण त्यातून जास्त टक्केवारी मिळते असंही जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं.
दरम्यान, प्रतिभा काकी बाहेर का पडावे लागले, का साहेबांच्या डोळ्यात तुम्ही अश्रू आणलेत. साहेबांची नाचक्की होईल असं का वागले. त्या माऊलीला किती वाईट वाटत असेल. ज्या माऊलीने तुम्हाला दूध पाजलं, तुम्हाला मोठे केले. साहेबांकडे आग्रह धरून त्यांच्यासाठी काय मिळवून दिले. तुम्ही आता सोडले, वयाच्या ८५ व्या वर्षी शरद पवारांना त्रास देऊन माऊलीच्या हृदयाला किती यातना झाल्या असतील याचा विचार तुम्ही केला का, साहेबांची अस्वस्था सगळ्यात जास्त प्रतिभा काकींना ठाऊक आहे. त्यामुळे आज त्या बाहेर पडल्या. त्यांना किती राग आहे हे तुम्हाला दिसत नाही का असा सवाल आव्हाडांनी विचारला.
दिलीप वळसे पाटलांवरही बरसले
४० वर्ष ज्या माणसांना मंत्रिपदे बहाल केली, अत्यंत विश्वासतला माणूस दिलीप वळसे पाटील त्यांनीही साथ सोडली. हा ४२ आमदारांचा निर्णय होता असं ते बोलतात, तुम्ही बालिशपणे बोलता, साहेबांनी तुमच्यावर इतकं प्रेम केले, त्यांना किती वेदना झाल्या असतील याचा विचार तुम्ही केला नाही. ४२ आमदारांना मानसपुत्र मानलं नव्हते, तुम्ही त्यांच्या बंगल्यात राहिला होता, तुम्ही विचार करायला हवा होता. आज साहेब बोलले आमचे कौटुंबिक संबंध नव्हते मग कशाला वाईट घेता, त्यांनाही भावना आहेत असा टोला जितेंद्र आव्हाडांनी दिलीप वळसे पाटील यांना लगावला.