मुंबई - २०१९ च्या विधानसभा निकालानंतर भाजपा आणि राष्ट्रवादी सरकार आणण्यासाठी गौतम अदानींच्या घरी अमित शाह, शरद पवार, प्रफुल पटेल, देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. या बैठकीला मीदेखील उपस्थित होतो असा दावा अजित पवारांनी पहाटेच्या शपथविधी सोहळ्याआधी घडलेल्या घटनांबाबत केला. त्यावर शरद पवारांनी एका मुलाखतीत भाष्य केले आहे. भाजपा-राष्ट्रवादी सरकार स्थापन झालं का? जर असं काही केले असते तर सरकार बघायला मिळालं असते. प्रत्यक्ष यअसं काही राज्य स्थापन केले का? मग नसताना असे प्रश्न काढायचे कशाला? असं सांगत अमित शाह आणि गौतम अदानी यांच्यासोबत भेटीवरही पवारांनी खुलासा केला आहे.
शरद पवार म्हणाले की, गौतम अदानी नव्हे तर मी अनेकांच्या घरी जातो. रतन टाटा असो वा किर्लोस्कर यांच्याही घरी जातो. आजही जातो. अदानी यांची महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक आहे. आणखी काही प्रकल्प काढण्याचा अदानींचा विचार आहे. महाराष्ट्रातील त्यांची गुंतवणूक जेव्हा मी राज्याचा मुख्यमंत्री होतो तेव्हा गोंदिया भंडारा परिसरात त्यांनी प्रकल्प सुरू केले त्याचे उद्घाटन मीच केले होते. त्या भागात कोळशाच्या खाणी विकसित करण्याचा विचार होता. त्यात त्यांनी लक्ष घातलं. केंद्र सरकारने ते काम त्यांना दिले. त्यावेळी भाजपा सरकार नव्हते. ते काम त्यांनी पूर्ण केले. त्याचे काही कार्यक्रम होते तेव्हा मी स्वत: गोंदियाला गेलो होतो. त्यामुळे जे महाराष्ट्रात औद्योगिक क्षेत्रात काम करू इच्छितात अशांच्या कामांना गती देणे, त्यांच्याशी सुसंवाद ठेवणे या गोष्टी राज्य म्हणून गरजेच्या असतात असं त्यांनी स्पष्ट केले. साम टिव्हीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी हे उत्तर दिले आहे.
तसेच अजित पवारांनी सांगितलेली एकही गोष्ट सत्य नाही. निवडणुकीचा कालावधी सोडल्यानंतर कधीही केंद्रातले मंत्री असो वा उद्योजक भेटत नाहीत असं मी कधी म्हणणार नाही. अनेकवेळा अजित पवारांना सोबत घेऊन मी अनेकदा भेटी घेतल्या आहेत जेणेकरून त्यांना माहिती व्हावी, त्यांना कळावं यासाठी करत असेन. देशाचे गृहमंत्री यांना मी एकदा काय, ३-४ वेळा भेटलो असेल. शिष्टमंडळ घेऊन भेटलोय. महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांचे काही प्रश्न होते, त्याबाबत त्यांना भेटलो, त्यांच्या घरी जाऊन भेटलो. शेवटी मी सार्वजनिक जीवनात काम करतो. संसदेचा सभासद आहे. मतदारसंघातील, राज्याचे काही प्रश्न पुढे येतात त्यात मार्ग काढण्याचा प्रयत्न होतो तेव्हा ज्यांच्याकडे निर्णय घेण्याचा अधिकार आहेत त्यांच्याशी सुसंवाद ठेवणे गरजेचे असते. संवाद ठेवणे, भेट घेणे यातून काही कारस्थान होतंय असं म्हणण्यात काही अर्थ नाही असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
अदानी-अंबानींवरून काँग्रेस आणि ठाकरे गटाचा भाजपावर निशाणा
मागील काही काळापासून काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून अदानी आणि अंबानी यांचा उल्लेख करून भाजपावर निशाणा साधला जातो. काँग्रेस नेते राहुल गांधी देशात मोदी नव्हे तर अदानी सरकार आहे, देशाचा पैसा लुटून अदानी आणि अंबानी यांना दिला जातो. अंबानी यांच्या कुटुंबातील लग्न सोहळ्यातील कोट्यवधीचा खर्चही राहुल गांधी यांनी एका भाषणात मांडला होता. तर धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी यांना देण्यावरून ठाकरे गटाकडून महायुती सरकारवर टीका केली जाते. मुंबई अदानीच्या घशात घालण्याचा भाजपाचा डाव आहे असा आरोप उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे करत असतात. मात्र शरद पवार यांनी अदानींसोबतच्या संबंधांवर उघडपणे स्पष्टीकरण दिले आहे.