"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 07:19 PM2024-10-31T19:19:43+5:302024-10-31T19:20:33+5:30
शरद पवार यांचा मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह अजित पवारांवर निशाणा
बारामती - केंद्र सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळाल्याने राज्यात अपेक्षित लक्ष देणे शक्य झाले नाही. त्यामुळे राज्याची जबाबदारी काही लोकांवर सोपवली. विश्वासाने जबाबदारी,सत्ता दिली. त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला. त्या लोकांनी वेगळे पाऊल टाकले. लोकांना वाटत स्वप्नात वाटलं नव्हतं ,असे त्या लोकांकडून घडले अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला.
शिरूर आंबेगाव मतदार संघातील उमेदवार देवदत्त निकम यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते शरद पवार यांच्या भेटीला येथील ‘गोविंदबाग’निवासस`थानी आले होते. यावेळी पवार यांनी वळसे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. पवार म्हणाले,यंदा ‘मविआ’समोर केंद्र आणि राज्याची सत्ता असणारी,पंतप्रधानांचा पाठींबा असणारी शक्ती आहे.त्यांच्याकडे सत्तेच्या जोरावर तूम्हा लोकांना वेगळ्या ठिकाणी नेऊ शकतो असा विश्वास आहे.मागील ५ वर्षांपुर्वी परिस्थिती वेगळी होती. राष्ट्रवादी एकत्र होती.त्यावेळी सत्ता आल्यावर बारामती आणि आंबेगाव ला मंत्री पद दिले. तर राज्यमंत्री पद इंदापूर ला दिले. जिल्ह्यात ३ मंत्री पदे कधी मिळाली नव्हती. त्यांच्याकडून जिल्ह्याकडे लक्ष दिले पाहिजे होतं. लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे गरजेचे होते. पक्षाने यांना सत्ता दिली. सत्ता आणण्यासाठी कार्यकर्ते यांनी कष्ट घेतले.त्यामुळे यांना मंत्रीपदे मिळाली. मात्र, याची आठवण आपल्या सहकारी यांना झाली नाही. ४४ आमदारांना घेवून आपले काहीजण दुसऱ्या बाजुला मिळाले.या भुमिकेत जनता सहभागी झाली नाही.पण प्रतिनिधी मात्र सहभागी झाला. त्यामुळे लोकांना धक्का बसल्याचे पवार म्हणाले.
दत्तात्रय वळसे पाटील यांनी मला जीवापाड सहकार्य केले. त्यांच्या सांगण्यामुळे त्यांच्या मुलाला सोबत घेतलं. त्यांना ताकद दिली. मंत्रीपदासह देशातील, राज्यातील काही महत्त्वाच्या संस्थांची जबाबदारी दिली. विश्वासातील लोक असावीत म्हणून हे केलं. मात्र, त्यांनी वेगळी निर्णय घेतला. सत्ता कायम टिकत नसते. सत्तेपेक्षा सत्तेवर बसविणारा सामान्य माणूस महत्त्वाचा असतो. त्यांनी जी भूमिका घेतली ती सामान्य माणसाला आवडली नाही. तुम्ही सुध्दा,असा प्रश्न सर्वसामान्य त्यांना विचारतात असा टोला पवार यांनी वळसे पाटील यांना लगावला. यावेळी समोरील लोक साधनाने, सत्तेच्या अधिकाराने पुर्ण ताकतीने आहेत. कारण त्यांना तुम्ही काय करू शकता हे कळाले आहे. तुम्ही फाटक्या खिशाचे असला तरी प्रामाणिक,बांधिलकी,निष्ठा जपणारे आहात. निवडणूकीत चिकाटीने काम केल्यास यश मिळेल. देशाला समजले पाहिले असे यश मिळवा असे आवाहन पवार यांनी केले.
लोकशाही मध्येे मोठी शक्ती आहे.१९७२ साली दुसर्यांदा मंत्री झालो होतो.त्यावेळी दाैंड तालुक्यात वर्तमान पत्र घरोघरी वाटणारा व्यक्ती आमदार झाला होता.ती व्यक्ती प्रामाणिक होती.स्वातंत्र्य चळवळीत ते तरुंगात गेले होते.लोकांनी त्यांना निवडुन दिले.हि लोकांची शक्ती आहे.लोकशाहीत मोठी शक्ती असल्याची आठवण शरद पवार यांनी सांगितली. प्रचारासाठी १४ दिवस आहेत.तर ८९ विधानसभा मतदारसंघ आहेत. सगळीकडून माझ्यावर दबाव आहे.प्रचारासाठी वेळ देण्याची सर्वत्र मागणी आहे.कोणत्या मतदारसंघात प्रचारासाठी जाण्याचे नियोजन अद्याप केलेले नसल्याचे शरद पवार यांनी नमुद केले.