राज्यातील सत्ताधारी महायुतीला सत्तेतून हटवण्यासाठी महाविकास आघाडीमधील घटक पक्षांना जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मात्र मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीमध्ये सातत्याने वादाच्या ठिणग्या पडत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी काल महाविकास आघाडीचे सरकार आल्यास जयंत पाटलांकडे महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार, अशा आशयाचं विधान केल्याने महाविकास आघाडीमध्ये खळबळ उडाली आहे. तसेच शरद पवार यांनी केलेल्या या विधानाबाबत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या ठाकरे गट आणि काँग्रेसच्या नेत्यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
शरद पवार यांनी जयंत पाटलांबाबत केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, शरद पवार यांनी तसे संकेत दिले असतील तर त्याच्यावर आम्ही चर्चा करू. पण शरद पवार अशा प्रकारे कधी कुठले संकेत देत नाहीत. मधल्या काळात त्यांनी रोहित पवार यांच्यावर मोठी जबाबदारी टाकण्याची घोषणा केली होती. मात्र एका पक्षात दोन मुख्यमंत्री होत नाहीत. मधल्या काळात सुप्रिया सुळे यांचंही नाव चाललं होतं. जितेंद्र आव्हाड यांच्या नावाचीही चर्चा सुरू होती. त्यामुळे पाच सहा लोक कसे काय मुख्यमंत्री होऊ शकतात, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
तर शरद पवार यांच्या विधानावर बोलताना काँग्रेसचे नेते नितीन राऊत म्हणाले की, मुख्यमंत्रिपदासाठी प्रमोशनचा विषय येत नाही. शरद पवार यांनी जयंत पाटील यांची मुख्यमंत्री होण्याची पात्रता आहे, योग्यता आहे, असं म्हटलंय. असं म्हणणं काही वावगं नाही. सर्वच पक्ष आपल्या पक्षामधील नेतृत्वाबाबत असं बोलत असतात. पण सरतेशेवटी काँग्रेस पक्षामध्ये पक्षश्रेष्ठी निर्णय घेतात, असे नितीन राऊत यांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिव स्वराज्य यात्रेचा समारोप इस्लापुरात झाला. या सभेत जयंत पाटील भाषणाला उभे राहिले, तेव्हा उपस्थितांनी त्यांच्या नावाने मुख्यमंत्रिपदाच्या घोषणा दिल्या गेल्या होत्या. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक संकेत दिले होते. त्यात शरद पवार म्हणाले होते की, आजच्या पिढीच्या जयंतरावसारख्या नेतृत्वाने उद्याचा महाराष्ट्र घडवण्याच्यासाठी, सावरण्यासाठी भूमिका आपल्या खांद्यावर घ्यावी. ही तुमची, माझी आणि संपूर्ण महाराष्ट्राची अपेक्षा आहे. त्या अपेक्षेच्या पूर्ततेला तुम्हा सगळ्यांची शक्ती असेल. मी एवढंच सांगतो. पक्षाचा प्रमुख म्हणून सांगतो. देशाचा पक्षाचा प्रमुख म्हणून सांगतो की, उद्याचा महाराष्ट्र सावरण्यासाठी आणि उद्याचा प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी मोलाची कामगिरी याच परिसरातून होणार आहे, याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही, असं सूचक विधान शरद पवार यांनी केलं होतं.