मुंबई - वरळी मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार मिलिंद देवरा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना काढलेल्या शोभायात्रेत पैसे देऊन माणसं आणल्याचा आरोप करत ठाकरे गटाने मुख्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी देवरांनी काढलेल्या शोभायात्रेत लोकांना पैशाचे आमिष दाखवून आणल्याचा आरोप केला आहे.
याबाबत खासदार अनिल देसाईंनी पत्रात म्हटलंय की, वरळी विधानसभेतील शिवसेना शिंदे गट उमेदवार मिलिंद देवरा यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करतानाच्या शोभायात्रेचे व्हिडिओ जोडत आहोत. सदर शोभायात्रेत चित्रीकरण करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींनी या शोभायात्रेत सहभागी लोकांना विचारले असता त्यांनी आपल्याला प्रत्येकी ५०० रुपये देऊन शोभायात्रेत सहभागी होण्यास सांगितल्याचे कॅमेऱ्यात कबुल केले. ज्याचे असंख्य व्हिडिओ सर्व प्रसिद्धी तसेच समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत.
निवडणूक आदर्श आचारसंहितेसंदर्भातील भारतीय राज्यघटनेच्या कलमानुसार पैशाचे आमिष दाखवणे हा गंभीर गुन्हा आहे. या गोष्टीची त्वरीत गंभीर दखल घेऊन याबाबतीत संबंधित अधिकाऱ्यांस निवडणूक आदर्श आचारसंहिता भंगाबाबत सख्त कारवाईचे निर्देश घ्यावेत व हा बेकायदेशीर खर्च वरळी विधानसभेचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात यावा अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाकडे पत्र लिहून केली आहे.
दरम्यान, ठाकरे गटाच्या पत्राची दखल घेऊन मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत. वरील तक्रारीच्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करण्यात यावी आणि केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल २४ तासांत या कार्यालयास सादर करावा असं कळवण्यात आले आहे.
याआधीही माहिममध्ये मनसेच्या दीपोत्सवावर आक्षेप घेत ठाकरे गटाने निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं होते. मनसेच्या दीपोत्सवात माहिमचे मनसे उमेदवार अमित ठाकरे उपस्थित होते, त्याशिवाय त्यांच्या पक्षाचे चिन्ह असलेले कंदील याठिकाणी लावण्यात आले होते. त्यामुळे हा सर्व खर्च उमेदवाराच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करावा अशी मागणी ठाकरे गटाने केली होती.