Maharashtra Assembly Election 2024 : वडीगोद्री (जि. जालना) : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली भूमिका आणि इच्छुक उमेदवारांशी साधलेला संवाद पाहता, शिंदेसेनेच्या नेतेमंडळींसह इतर विविध पक्षांतील नेत्यांची पावले अंतरवाली सराटीकडे वळली आहेत. मंत्री उदय सामंत, खा. संदीपान भुमरे, मंगेश चिवटे यांच्यासह छत्रपती संभाजीराजे, अनिल गोटे, राजरत्न आंबेडकर यांनी शनिवारी जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली.
जरांगे पाटील यांनी आरक्षित जागेवर आपल्या विचारांच्या उमेदवाराला पाठिंबा देणे आणि गरजेनुसार पाडापाडी करण्याची भूमिका घेत दोन दिवसांपूर्वी राज्यभरातील इच्छुकांशी संवादही साधला आहे. या पार्श्वभूमीवर जरांगेंना सोबत घेऊन तिसरी आघाडी, चौथी आघाडी करण्यासाठीही अनेकांनी जोर लावला आहे.
उमेदवारांचा निर्णय बुधवारीजरांगे पाटील यांनी राखीव प्रवर्गातील इच्छुकांशी शनिवारी सहा तास चर्चा केली. एका जातीवर निवडणूक होणे शक्य नाही. त्यामुळे मराठा समाजासह मुस्लिम आणि मागासवर्गीय समाज एक होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. उमेदवारांबाबतचा निर्णय ३० ऑक्टोबर किंवा १ नोव्हेंबर रोजी घेणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली. शिवाय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात प्रचाराला जाणार असल्याचेही ते म्हणाले.
छत्रपती शाहू महाराजांनी सर्वांना आरक्षण दिले आहे. सर्वांना एका छताखाली आणण्यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे. आपण वेगळे लढलो तर समाजात वेगळा मेसेज जाईल. आपण एकसंध कसे राहू शकतो, यासह इतर मुद्द्यांवर चर्चा केली. त्यांनी लवकर निर्णय घ्यावा. निवडणुकीत दोन्ही उमेदवार समोरासमोर येणं योग्य वाटत नाही.- संभाजीराजे छत्रपती