Maharashtra Assembly Election 2024: जागावाटपावरून महाविकास आघाडीतील बिघाडी वाढत असल्याचे दिसत आहे. तर महायुतीच्या काही जागा सोडल्यास बाकी जागावाटप जवळपास पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग येत आहे. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा गुवाहाटीला जाणार असून, कामाख्या देवीचे दर्शन घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याबाबत शिवसेना शिंदे गटातील नेत्यांनी सूचक विधान केले आहे.
सन २०२२ मध्ये शिवसेनेत मोठी बंडाळी झाली. एकनाथ शिंदे अनेक आमदारांना घेऊन आधी सुरतला गेले आणि त्यानंतर गुवाहाटीला गेले. त्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या आणि महाविकास आघाडीचे सरकार पडले. भाजपा आणि एकनाथ शिंदे यांनी युतीचे सरकार स्थापन केले. गुवाहाटीला गेल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली होती, असे सांगितले जाते. त्यामुळेच त्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर गुवाहाटीमधील कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचे दर्शन घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. याबाबत शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली.
विधानसभा निवडणुकीपूर्वी CM एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाणार?
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना संजय शिरसाट म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचे दर्शन घेणार असल्याची माहिती मलाही समजली आहे. जर मुख्यमंत्री गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचे दर्शन घेणार असतील तर चांगलेच आहे. कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणे काही गैर नाही. कामाख्या देवीच्या आशीर्वादामुळे आमचा उठाव यशस्वी झाला. काही लोक आमचा पोस्टमॉर्टम करणार होते, त्यांना कामाख्या देवीचा शाप लागला. त्यातून ते आताही बाहेर पडलेले नाहीत. त्यामुळे कामाख्या देवीचा आशीर्वाद आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, असे संजय शिरसाट यांनी सांगितले.
दरम्यान, महायुतीच्या जागावाटपासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी नवी दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. सुमारे अडीच तास झालेल्या या बैठकीत २० ते २५ जागांचा अपवाद वगळता उर्वरित जागांच्या वाटपाचा फॉर्म्युला अंतिम झाला असून, तीनही नेत्यांनी त्यावर शिक्कामोर्तब केल्याचे समजते. राज्यात परतल्यावर दिल्लीतील बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून, येत्या दोन-तीन दिवसांत जागावाटप जाहीर करण्यात येईल, असा विश्वास तिघांनी व्यक्त केला.