विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर राज्यातील बहुतांश मतदारसंघातील लढतींचं चित्र स्पष्ट झालं आहे. तसेच अनेक ठिकाणी सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याचंही दिसत आहे. त्यात नाशिकमधील काही मतदारसंघात सत्ताधारी महायुतीमधीलशिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे उघडपणे आमने सामने आल्याचं दिसत आहे. एकीकडे नांदगावमध्ये शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्याविरोधात अजित पवार गडाकडून समीर भुजबळ यांनी बंडखोरी केली आहे. तर दुसरीकडे जागावाटपात अजित पवार गटाच्या वाट्याला गेलेल्या दिंडोरी आणि देवळालीमध्ये शिंदे गटाकडून बंडखोरी झाली आहे. मात्र या दोन्ही मतदारसंघातील बंडखोरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एबी फॉर्म दिल्याने महायुतीमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे.
नाशिकमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याचा अखेरचा दिवस राजकारण आणि नाट्यमय घडामोडींनी गाजला. मंगळवारी शिंदे गटाने कमाल करीत नाशिक जिल्ह्यातील दोन एबी फॉर्मसाठी खास हेलिकॉप्टर पाठवले आणि घाईघाईने यातील एक फॉर्म ओझर विमानतळावरच धनराज महाले यांना दिला, तर दुसरा फॉर्म देण्यासाठी अत्यंत धावपळीत पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी नाशिक शहरातील भरतनगर येथे पोहोचले आणि उमेदवारी दाखल करण्याची मदत संपण्याच्या अवघ्या दोन ते तीन मिनिटे अगोदर राजश्री अहिरराव यांच्या उमेदवारी अर्जाला एबी फॉर्म जोडला.
महायुतीत जागावाटप अगोदरच शांततेत पार पडले असल्याचे सांगण्यात आले. मात्र, अखेरच्या दिवशी जिल्ह्यात दोन ठिकाणी बेबनाव उघड झाला आहे. दिंडोरीमध्ये राष्ट्रवादी अजित आमदार नरहरी पवार गटाने झिरवाळ यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्याविरोधात शिवसेना शिंदे गटाकडून धनराज महाले यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. तर देवळाली विधानसभा मतदारंघात सरोज आहिरे यांना अजित पवार गटाने उमेदवारी दिली होती. मात्र त्यांच्याविरोधात माजी तहसीलदार राजश्री अहिरराव यांना उमेदवारी देण्याचा निर्णय सोमवारी रात्री देण्यात आला. त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शिंदे गटाने माजी आमदार धनराज महाले, तर देवळालीत सरोज अहिरे यांना एबी फॉर्म देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मंगळवारी दुपारी शिंदेसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी खास हेलिकॉप्टरने दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ओझर विमानतळावर दाखल झाले. धनराज महाले यांनी तेथेच एबी फॉर्म घेतला, तर राजश्री अहिरराव यांचा फॉर्म नाशिकमध्ये निवडणूक कार्यालयातून देण्यात आला. त्यामुळे आता या दोन्ही मतदारसंघात महायुतीची काय अंतिम भूमिका असेल, याबाबत उत्सुकता आहे.