मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार भारती कामडी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. पालघर सह संपर्कप्रमुख वैभव संखे आणि उपनेते जगदीश धोडी यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी भारती कामडी यांचा पक्षप्रवेश पार पडला.
लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिल्यानंतर आता भारती कामडी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे. पालघर लोकसभा मतदारसंघात भाजपचे हेमंत विष्णू सावरा आणि भारती कामडी यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी हेमंत विष्णू सावरा यांनी भारती कामडी यांचा पराभव केला. भारती कामडी यांना लोकसभा निवडणुकीत चार लाख मत मिळाले होती. मात्र, आता भारती कामडी यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
पालघर लोकसभा निवडणुकीत हेमंत सावरा यांना 6 लाख 1 हजार 244 मतं मिळाली होती. तर कामडी यांना 4 लाख 17 हजार 938 मतं मिळवली होती. दोन्ही उमेदवारांमध्ये 1 लाख 83 हजार 306 मतांचा फरक होता. तर तिसऱ्या क्रमांकाच्या बहुजन विकास आघाडी या हितेंद्र ठाकूर यांच्या राजेश पाटील या उमेदवारानं 2 लाख 54 हजार 517 मते मिळवली होती.
दरम्यान, शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सर्वंच कार्यकर्त्यांचा ओढा होता. मात्र, भारती कामडी या 'मातोश्री'शी एकनिष्ठ राहिल्या. त्याचेच फळ म्हणून त्यांना लोकसभेच्यावेळी उमेदवारी ठाकरे गटाकडून मिळाली. मात्र, आता त्यांनाही ठाकरे गटाला रामराम ठोकत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पालघरमध्ये राजकीय घडामोडींचा वेग आला आहे.