नागपूर : राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. या निवडणुकीसाठी प्रचाराचा जोर वाढणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नागपूरसह इतर जिल्ह्यांमध्ये चार प्रचार सभांचे नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी अमित शाह शनिवारी रात्रीच नागपुरात दाखल झाले होते. मात्र, आज अमित शाह हे तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांच्या सभा भाजपचे इतर नेते घेणार आहेत.
विदर्भातील चार सभांसाठी अमित शाह काल संध्याकाळीच नागपुरात दाखल झाले होते. आज अमित शाह यांच्या गडचिरोली, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील काटोल आणि सावनेरमध्ये, अशा सर्व चार सभा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. या सभांसाठी पूर्ण तयारी देखील झाली होती. मात्र, अमित शाह हे अचानक आपला महाराष्ट्र दौरा रद्द करत दिल्लीला रवाना झाले. त्यामुळे अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा अचानक रद्द झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
काही अपरिहार्य कारणाने त्यांचा दौरा रद्द झाल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्याऐवजी भाजपचे अन्य नेते सभा घेतील, अशी माहिती आहे. परंतू अमित शाह अचानक दिल्लीला का गेले?, त्याचे कारण समजू शकलेले नाही. दरम्यान, नागपुरातल्या हॉटेल एडिसन ब्लू येथे अमित शाह थांबलेले होते. तर आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास ते सभेसाठी गडचिरोलीला रवाना होणार होते. मात्र आता हा त्यांचा दौरा रद्द झाला आहे. दरम्यान, अमित शाह यांच्या नियोजित असलेल्या चारही सभांना आज स्मृती इराणी संबोधित करतील, असेही सांगण्यात येत आहे.