महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 10:15 PM2024-11-25T22:15:45+5:302024-11-25T22:16:49+5:30
Maharashtra New CM : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहेत
Maharashtra Assembly Election 2024 : नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वातील महायुतीने प्रचंड बहुमताने राज्याची सत्ता काबीज केली. पण, आता मुख्यमंत्रिपदावरुन महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदावर कायम ठेवावे, अशी शिंदेंच्या आमदाराची मागणी आहे. तर, भाजप सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याची मागणी भाजप आमदार करत आहेत. अशातच, एकनाथ शिंदे नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुख्यमंत्रिपदावरुन महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. तर, एकनाथ शिंदेदेखील मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही आहेत. तसेच, अमित शाह उद्या फडणवीसांच्या नावाची अधिकृत घोषणा करू शकतात. त्यामुळे शिंदे उद्या मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. शिंदेंची नाराजी दूर करण्याची जबाबदारी केंद्रातील भाजपच्या दोन ज्येष्ठ नेत्यांवर सोपवण्यात आली आहे. आता ते शिंदेंची नाराजी दूर करण्यात कितपत यशस्वी होतात, हे पाहणे महत्वाचे आहे.
अजित पवारांचा भाजपला पाठिंबा
दुसरीकडे, मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाला अजित पवारांचा पाठिंबा असल्याची माहिती आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अजित पवारांनी दिल्लीतील भाजप हायकमांडला आपला निरोप कळवला आहे. महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री असेल, तर अजित पवार गटाला कोणतीही अडचण असणार नाही. अशा परिस्थितीत भाजप हायकमांड नेमका काय निर्णय घेणार, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून आहे.