आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 03:18 PM2024-11-19T15:18:48+5:302024-11-19T15:19:58+5:30
जे लोकसभेला घडले तेच विधानसभेला घडेल, बारामती शरद पवारांची होती आणि त्यांचीच राहील असा विश्वास श्रीनिवास पवारांनी व्यक्त केला.
बारामती - आईवर मुंबईत उपचार सुरू होते, ८ दिवस उपचार थांबवून तिला बारामतीत आणलं असं सांगत श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांवर मोठा आरोप केला आहे.
श्रीनिवास पवार यांनी एका मुलाखतीत म्हटलं की, माझ्या आईचे वय ८७ आहे. प्रचाराच्या आदल्या दिवशी तिला मुंबईहून आणलं. तिच्यावर उपचार सुरू आहेत. उपचार थांबवून तिला इथं आणलं. मी भेटायला गेलो होतो तेव्हा मला त्रास होतोय असं ती म्हणाली. बारामतीत तशी चर्चा होती आईला सभेत आणणार आहे. मी तिला विचारलं, माझ्या कानावर आलंय तू सभेला जाणार आहेस. त्यावर तिने सांगितले, मला २ पाऊले चालवत नाही. खूप त्रास होतोय, मी काही जाणार नाही. मी तिला सांगितले जे काही होईल ते होईल तू काही मनाला लावून घेऊ नकोस. ठराविक वयानंतर बऱ्याच गोष्टीत दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे मला काही बोलायचे नाही. २५ तारखेला आई मुंबईला जाईल आणि उरलेली ८ दिवसांची ट्रिटमेंट पूर्ण करेल. आईला त्रास होईल म्हणून मी राजकारणाचं काही बोलत नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच अजित पवार कौटुंबिक कार्यक्रमाला येणे टाळतात. दिवाळीला आला नाही. साहेबांकडे दिवाळी कार्यक्रम होतो तिथे आला नाही. त्यामुळे कौटुंबिक वेळी अजित पवारांची भेट झाली नाही. राजकारणावर आम्ही बोलत नाही. मोठी बहीण ही दादाचे व्यवसाय बघते, दादाचे जे काही साखर कारखाने आहेत ते सांभाळते, त्यामुळे तिची काही मजबुरी असेल असं सांगत मोठी बहीण दादांच्या प्रचाराला दिसण्यामागचं कारण श्रीनिवास पवारांनी सांगितले.
दरम्यान, पवार कुटुंब एकजूट होतं त्यात फूट पाडण्यात विरोधक यशस्वी झाले. अजितदादा भाजपासोबत गेले, तात्यासाहेब पवारांचे घर फोडले असं त्याने म्हटलं. आम्ही दोघे भाऊ आहे. मीपण तात्यासाहेब पवारांचा मुलगा आहे पण मी असे काही म्हणत नाही. मी साहेबांना जन्मापासून ओळखतो. तोही ओळखतो पण आता तो वेगळे बोलायला लागला आहे. गेली ३५ वर्ष ज्या साहेबांनी पदे दिली, त्यांच्यावर घर फोडल्याचा आरोप करताना पदे देताना आठवले नाही. बारामती ही शरद पवारांची आणि त्यांचीच आहे. जे लोकसभेला घडले तेच विधानसभेला घडेल असा विश्वास श्रीनिवास पवार यांनी व्यक्त केला.