Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. आचारसंहिता लागू होताच राज्यातील राजकारणाला वेग आला आहे. यातच महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांकडून केंद्रातील नेतृत्वाला सुमारे ११५ जणांच्या नावांची यादी सादर केल्याची माहिती मिळाली आहे. यासंदर्भात एक बैठक होणार असून, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीला जाण्याची शक्यता आहे.
महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अद्यापही सुरू आहे. भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट नेमक्या किती जागा लढणार, याबाबत स्पष्टता झाल्याचे पाहायला मिळत नाही. परंतु, यातच आता भाजपाच्या गोटात हालचालींना वेग आला असून, विद्यमान आमदार, भाजपा समर्थक अपक्ष आमदार यांच्या मतदारसंघातील आढावा घेण्यात आला आहे. यानंतर आता सुमारे १०० ते ११५ जणांच्या नावांची शिफारस राज्यातील भाजपाने केंद्रीय नेतृत्वाला केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
कोणत्या नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी? कुणाला मिळणार डच्चू?
भाजपाची पहिली यादी आज किंवा उद्यापर्यंत येऊ शकते, असा कयास बांधला जात आहे. दिल्लीत आज यासंदर्भात एक महत्त्वाची बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे. दोन दिवसांपूर्वी भाजपा नेत्यांची एक महत्त्वाची बैठक दिल्लीत झाली होती. या बैठकीनंतर १०० किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवारांची पहिली यादी येऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर आता राज्यातील पक्ष नेतृत्वाने केंद्रातील नेतृत्वाला ११५ जणांच्या नावांची यादी पाठवली आहे. त्यामुळे आता कोणत्या नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार, विद्यमान आमदारांपैकी कोणाची पुन्हा वर्णी लागणार तसेच कोणाचा पत्ता कट केला जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत एबीपीने वृत्त दिले आहे.
दरम्यान, महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात असलेल्या भाजपाने यंदा किमान १५० जागा लढवण्याचा पवित्रा घेतला असून जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी पक्षाकडून धक्कातंत्राचा अवलंब केला जाण्याची शक्यता आहे. ज्या आमदारांविरुद्ध मतदारसंघात नाराजी आहे अशा आमदारांची तिकिटे भाजपाकडून कापण्यात येणार आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.