Baramati Court Summons Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी बारामती कोर्टाकडून समन्स बजावण्यात आलं आहे. २०१४ च्या निवडणुकांमध्ये केलेल्या एका वक्तव्यामुळे बारामतीच्या कोर्टाकडून समन्स बजावण्यात आलं आहे. बारामती कोर्टाने अजित पवार यांना आपली बाजू न्यायालयात मांडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अजित पवार कोर्टात काय भूमिका मांडतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अजित पवार यांना बारामती कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. आता १६ डिसेंबर रोजी अजित पवार यांना कोर्टात हजर राहून आपली बाजू मांडावी लागणार आहे. २०१४ सालच्या निवडणुकीदरम्यान, अजित पवारांनी केलेल्या एका वक्तव्यासंदर्भात हे सगळं प्रकरण आहे.
माझी आयपीएस अधिकारी सुरेख खोपडे यांनी अजित पवारांच्या वक्तव्याविरोधात याचिका दाखल केली होती. सुरेश खापडे हे २०१४ मध्ये आपच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी देखील त्यांनी यासंदर्भात तक्रार केली होती. खोपडे यांच्या तक्रारीनुसार बारामती कोर्टाने अजित पवारांना हे समन्स बजावलं आहे. त्यामुळे त्यांना १६ डिसेंबर रोजी कोर्टात हजर राहण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बारामती तालुक्यातील मतदारांना अजित पवार यांनी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला होता. निवडणूक प्रचार संपल्यानंतरही अजित पवार हे मासाळवाडी या गावामध्ये गेले होते. त्यावेळी गावातील लोकांनी पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना मतदान केले नाही तर गावचे पाणी बंद करु, असा इशारा दिला होता. तुमचा पाणी प्रश्न दोन महिन्यांत सोडवतो, परंतु मतदान आम्हालाच करा, असेही अजित पवार यांनी म्हटले होते.