Sunil Tatkare Slam Jayant Patil :राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर दोन गटांमध्ये वाद सुरु असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने घड्याळ चिन्हाच्या गैरवापराबाबत सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. त्यावरून सुप्रीम कोर्टा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाला ३६ तासांत अस्वीकरण पत्रक प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, अजित पवार गटाने वृत्तपत्रांमध्ये नवीन हमीपत्र प्रकाशित केलं होतं. या हमीपत्रावरुन जयंत पाटील यांनी अजित पवार गटाला टोला लगावला.
पृथ्वीवर असा पक्ष नसेल ज्या पक्षाच्या चिन्हाखाली लिहायला लागतंय आमचं चिन्ह 'न्याय प्रविष्ठ' आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली होती. पक्ष चिन्हावरुन जयंत पाटील यांनी अजित पवारांवर टीका केल्यानंतर आता राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. इतकी वर्षे जयंत पाटील घड्याळाच्या ताकदीवर निवडून यायचे. पण यावेळी जयंत पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम होणार असल्याची टीका खासदार सुनील तटकरे यांनी केली आहे.
"१९९९ सालापासून जयंत पाटील ज्या चिन्हावर निवडून आले त्याबद्दल त्यांनी असं भाष्य केलं आहे. करेक्ट कार्यक्रमसाठी प्रसिद्ध असलेल्या जयंत पाटलांचा करेक्ट कार्यक्रम आता नक्की होणार आहे," असं सुनील तटकरे म्हणाले.
"जयंत पाटील यांनी आता मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. ते आतल्या गाठीचे असून त्यांच्या पोटात एक आणि ओठात एक असतं." असेही सुनील तटकरेंनी म्हटलं.
काय म्हणाले जयंत पाटील?
"आमचं घड्याळ चिन्ह चोरीला गेलं आहे. पण, पृथ्वीवर असा पक्ष नसेल ज्या पक्षाच्या चिन्हाखाली लिहायला लागतंय आमचं चिन्ह 'न्याय प्रविष्ठ' आहे. ऑस्ट्रेलियात, चीन, पाकिस्तानमध्ये जावा, पण अशी नौबत कोणत्याच पक्षावर आली नाही. आमचं हे चिन्ह आहे, पण न्यायप्रविष्ठ आहे हे सांगावं लागतं आहे, आमचं घड्याळ चोरीला गेलं आहे त्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस आम्ही चिन्ह घेतलं आहे," असं जयंत पाटील यांनी
दरम्यान, शरद पवार गटाच्या दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला ३६ तासांच्या आत नवीन हमीपत्र प्रकाशित करण्यास सांगितले होते. त्यानुसार अजित पवार गटाने वृत्तपत्रांमध्ये मराठीमध्ये डिस्क्लेमर प्रकाशित केलं आहे.