Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. आचारसंहिता लागू होताच राज्यातील राजकारणाला वेग आला आहे. यातच आता पक्षांतराचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्ष बदलणाऱ्यांची संख्या वाढू शकते, अशी चर्चा आहे. यातच आता आमदार रवी राणा यांना ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धक्का बसला असून, विश्वासू सहकाऱ्याने साथ सोडल्याचे सांगितले जात आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे मुख्य प्रवक्त्याने संघटनेचा राजीनामा देण्याच्या तयारी आहेत. ते रवी राणा यांचे अंत्यत विश्वासू आणि निकटवर्तीय असल्याचे मानले जातात. गेल्या १७ वर्षांपासून युवा स्वाभिमान संघटनेसोबत काम करत आहेत. रवी राणा यांचे निकटवर्तीय म्हणून ते कायमच सक्रीय असायचे. मात्र, ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राजीनामा देण्याची तयारी केल्याने हा रवी राणा यांना मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
मला जबाबदारीतून मुक्त करा
आमदार रवी राणा हे युवा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आहे. युवा स्वाभिमान पक्षाचे मुख्य प्रवक्ते जितू दुधाने यांनी रवी राणांची साथ सोडण्याची तयारी केली आहे. युवा स्वाभिमान संघटनेत माझी घुसमट होत आहे. त्यामुळे मला जबाबदारीतून मुक्त करा, असे ते म्हणालेत. जितू दुधाने यांच्या या भूमिकेमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. जितू दुधाने आता कोणता झेंडा हाती घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच आता इनकमिंग आऊटगोईंगला सुरुवात झाली आहे. सध्या महायुतीतून अनेक नेते, पदाधिकारी हे महाविकास आघाडीत प्रवेश करत आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील काही नेते, पदाधिकारी महायुतीत प्रवेश करताना पाहायला मिळत आहेत. लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांचा पराभव झाला होता.