कुणाकडून कोण रिंगणात... घोळ मिटेना! जागावाटपाचा सस्पेन्स कायम; आता माघारीवर नेत्यांमध्ये होणार घमासान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 06:49 AM2024-10-30T06:49:39+5:302024-10-30T09:52:17+5:30

Maharashtra Assembly Election 2024 : माघार कोण घेणार याकडे लक्ष, माघारीवर नेत्यांमध्ये होणार घमासान; काही ठिकाणी एकाच गटातील दोन-दोन ‘अधिकृत उमेदवारी’

Maharashtra Assembly Election 2024 : Suspense of seat allotment remains in Mahayuti and Mahavikas Aghadi; Now there will be a fight between the leaders on the retreat | कुणाकडून कोण रिंगणात... घोळ मिटेना! जागावाटपाचा सस्पेन्स कायम; आता माघारीवर नेत्यांमध्ये होणार घमासान

कुणाकडून कोण रिंगणात... घोळ मिटेना! जागावाटपाचा सस्पेन्स कायम; आता माघारीवर नेत्यांमध्ये होणार घमासान

- दीपक भातुसे

Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधी कुठला पक्ष किती आणि कोणत्या जागा लढवणार हे जाहीर करणाऱ्या महायुतीमहाविकास आघाडीला विधानसभेच्या जागावाटपाचा घोळ शेवटपर्यंत मिटवता आला नाही. एक तर २८८ मतदारसंघ आणि त्यात एका मतदारसंघावर एकापेक्षा जास्त मित्रपक्षांनी दावा सांगितल्याने शेवटपर्यंत दोन्हीकडून कोण किती आणि कोणत्या जागा लढवणार हे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले नाही.

गोंधळामुळे महायुती आण मविआत काही मतदारसंघावर दोन-दोन उमेदवार रिंगणात असून दोन्हीकडील काही जागांचा हिशेबच लागत नाही. कदाचित उमेदवार अधिकृतपणे जाहीर न करताच दोन्हीकडून एबी फॉर्म दिले गेले असण्याची शक्यता आहे. मंगळवारी अखेरच्या काही तासांपर्यंत महायुतीकडून उमेदवारी याद्या प्रसिद्ध करण्यात येत होत्या.

दोन्ही आघाडी, युतीचे चर्चेचे गुऱ्हाळ एवढे प्रदीर्घ चालले की, शेवटचा दिवसही याद्या प्रसिद्ध करण्याचाच होता. तिन्ही पक्षांना अंदाज असल्याने आपापल्या उमेदवाराकडे एबी फॉर्म पोहोचेल याची सोय करण्यात आली होती. घोळ होऊन दोन-दोन उमेदवारांनी पक्षाच्या एबी फॉर्मवर अर्ज भरले आहेत. अंतिम चित्र आता अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी स्पष्ट होईल.

गोंधळामुळे अनेक मतदारसंघात मित्रपक्षांतच लढत
मविआ : 
मित्रपक्षांत लढत
परांडा : शरद पवार गटाकडून राहुल मोटे, उद्धव सेनेकडून रणजित पाटील
पंढरपूर : शरद पवार गटाकडून अनिल सावंत, काँग्रेसकडून भगीरथ भालके
दिग्रस : काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे, उद्धव सेनेकडून पवन जयस्वाल
धारावी : काँग्रेसकडून ज्योती गायकवाड, उद्धवसेनेकडून बाबूराव माने

मविआत लहान घटक पक्षांंशी लढत
मविआने घटक पक्षांना काही मतदारसंघ सोडले, तर काही मतदारसंघात उमेदवारही उभे केले आहेत. कळवण, डहाणू माकपला, भिवंडी पूर्व सपाला सोडले. मात्र मित्रपक्षांच्या काही मतदारसंघात मविआतील उमेदवार आहेत. 
मानखुर्द : सपाकडून अबू आझमी, उद्धव सेनेकडून राजेंद्र वाघमारे
सोलापूर शहर मध्य : काँग्रेसकडून चेतन नरोटे, तर मित्रपक्ष असलेले माकपकडून नरसय्या आडम
सांगोला : उद्धव सेनेकडून दीपक आबा साळुंखे, तर मित्र पक्ष असलेल्या शेकापकडून बाबासाहेब देशमुख 
लोहा कंधार : उद्धव सेनेकडून एकनाथ पवार, शेकापकडून आशा शिंदे.

महायुती : मित्र पक्षांत लढत
मोर्शी : अजित पवार गटाकडून देवेंद्र भुयार, भाजपकडून उमेश यावलकर 
आष्टी : अजित पवार गटाकडून बाळासाहेब आजबे, भाजपकडून सुरेश धस
श्रीरामपुर : अजित पवार गटाकडून लहू कानडे, शिंदे सेनेकडून भाऊसाहेब कांबळे
दिंडोरी : अजित पवार गटाकडून नरहरी झिरवाळ, शिंदे सेनेकडून धनराज महाले
देवळाली : अजित पवार गटाकडून सरोज अहिरे, शिंदे सेनेकडून राजश्री अहिरराव
अणुशक्तीनगर : अजित पवार गटाकडून नवाब मलिक, शिंदे सेनेकडून सुरेश पाटील

कोण किती जागा लढवणार?
मविआ : काँग्रेस - १०३, ठाकरे - ९६, शरद पवार ८७ असे मविआचे २८६ उमेदवार रिंगणात आहेत. दोन मतदारसंघांचे काय ते स्पष्ट होत नाही, दुसराकडे चार ठिकाणी मित्र पक्षांच्या उमेदवारांचा गोंधळ आहे. 
महायुती : भाजप - १४८+४ (मित्रपक्ष), शिंदे सेना - ८०, अजित पवार गट ५२ असे महायुतीचे २८४ उमेदवार रिंगणात. चार मतदारसंघांचे काय ते स्पष्ट होत नाही, तर सहा मतदारसंघात मित्र पक्षांच्या उमेदवारांचा गोंधळ आहे.

मंत्री गावितांनी भरला अपक्ष अर्ज आणि अफवांचे पीक
नंदुरबार : नंदुरबार मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याकडून पक्षाने एबी फॉर्म परत मागितल्याची चर्चा होती. तसा कॉलही प्रदेश कार्यालयातून त्यांना आल्याचे सांगितले जात होते. मात्र, पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर सावधगिरी म्हणून आपण अपक्ष अर्ज भरल्याचे त्यांनीच स्पष्ट केले आणि या चर्चेवर पडदा पडला आहे.

संगमनेर मतदारसंघात थोरात-विखे सामना नाही
अहिल्यानगर : संगमनेर विधानसभा मतदारसंघात भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे हे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात रिंगणात उतरतील, अशी जोरदार चर्चा होती. मात्र, विखे यांनी उमेदवारी दाखल केलेली नाही. त्यामुळे थोरात यांचा सामना शिंदेसेनेचे अमोल खताळ यांच्याशी होईल.

 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 : Suspense of seat allotment remains in Mahayuti and Mahavikas Aghadi; Now there will be a fight between the leaders on the retreat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.