"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 05:25 PM2024-11-08T17:25:59+5:302024-11-08T17:34:41+5:30

Ajit Pawar : मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजित पवार यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे.

Maharashtra Assembly Election 2024 Talking about the post of Chief Minister Ajit Pawar has made an important statement | "कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."

"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीआधीपासूनच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरुन जोरदार चर्चा सुरु होती. त्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीनेही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. ज्यांच्याकडे संख्याबळ जास्त असेल त्याचाच मुख्यमंत्री होईल असे दोन्ही कडून सांगण्यात आलं आहे. मात्र आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना मुख्यमंत्रीपदाबाबत महत्त्वाचे विधान केलं आहे. कॉम्प्रोमाईज करणारा माणूस पुढे यशस्वी होतो, असं सूचक विधान अजित पवार यांनी केले आहे.

टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीनुसार महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमधून अजित पवार हे बाहेर पडल्याचे दिसत आहे. मुलाखतीमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजित पवारांनी नरमाईचे संकेत दिले आहेत. दोन पावलं मागे पुढे घेऊन कॉम्प्रोमाईज करावं लागतं असं मोठं विधान अजित पवार यांनी केलं आहे. मुख्यमंत्रीपदाचा विषय आपल्यासाठी गौण असल्याचेही अजित पवार म्हणाले.

"त्यावेळी मी मुख्यमंत्रीपदाबाबत बोलतो होतो हे मान्य आहे. पण आता निवडणुकीची धामधूम सुरु असून आम्ही युती केलेली आहे. युतीमध्ये आमचं पहिलं टार्गेट पावणे दोनशे पेक्षा जास्त महायुतीच्या निवडून आणायच्या हे आहे. मग आम्ही एकत्र बसून त्यातून नेत्याची निवड करु. कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही ज्यावेळी काम करता तेव्हा दोन पावलं पुढे मागे सरकावचं लागतं.  कॉम्प्रोमाईज करावं लागतं. जो  कॉम्प्रोमाईज करतो तोच माणूस पुढे यशस्वी होतो. त्यामुळे आता तो मुद्दा आमच्यासाठी गौण आहे. आमच्यासाठी महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीचे सरकार निवडून द्यावं हा आमचा मुख्य अजेंडा आहे," असं अजित पवार म्हणाले.

मुख्यमंत्रीपदाबाबत अमित शाहांचे संकेत

सांगलीतल्या शिराळा येथील सभेत अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीसांना विजयी करायचं आहे, असं विधान केलं आहे. देवेंद्र फडणवीसांचे नाव घेऊन पुढील मुख्यमंत्रि‍पदाचे संकेत शाहांनी दिले असंही बोललं जात आहे. "२० तारखेला महाराष्ट्रात मतदान होणार आहे, त्यात तुम्हाला निर्णायक भूमिका घ्यावी लागेल. मी दीड महिन्यापूर्वी महाराष्ट्राचा दौरा केला. जिथं जिथं मी गेलो, मग विदर्भ, मुंबई, कोकण, कोल्हापूर, जळगाव उत्तर महाराष्ट्रात गेलो तिथे तिथे महायुती सरकार बनवायचं आहे आणि देवेंद्र फडणवीसांना विजयी करायचं आहे," असं अमित शाह यांनी म्हटलं.

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 Talking about the post of Chief Minister Ajit Pawar has made an important statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.