५ महिन्यात उलटलात, नियती तुम्हाला धडा शिकवेल; ठाकरे गटाचा काँग्रेस नेत्यांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 11:06 AM2024-11-09T11:06:27+5:302024-11-09T11:08:23+5:30

रामटेक मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरोधात काँग्रेस जिल्हाध्यक्षांनीच बंडखोरी केली आहे. त्यांच्या उमेदवारीमागे स्थानिक काँग्रेस नेते आहेत त्यामुळे ठाकरे गट संतापला आहे. 

Maharashtra Assembly Election 2024 - Thackeray group leader Bhaskar Jadhav criticizes Congress leader Sunil Kedar, MP Shyam Kumar Barve over insurgency in Ramtek constituency | ५ महिन्यात उलटलात, नियती तुम्हाला धडा शिकवेल; ठाकरे गटाचा काँग्रेस नेत्यांवर हल्लाबोल

५ महिन्यात उलटलात, नियती तुम्हाला धडा शिकवेल; ठाकरे गटाचा काँग्रेस नेत्यांवर हल्लाबोल

रामटेक - आज विधानसभेला काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी बंडखोरी केली. मात्र त्यांच्या बंडखोरीमागे काँग्रेस नेते सुनील केदार, खासदार श्यामकुमार बर्वे हे त्यांना पाठिंबा देतात. तुम्ही माणसं आहात की जनावरे, तुम्ही आहात कोण...? ५ महिन्यापूर्वी या शिवसैनिकांनी, जनतेने तुम्हाला रक्ताचं पाणी करून निवडून आणले पण तुम्ही ५ महिन्यात उलटलात अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी काँग्रेस नेत्यांवर निशाणा साधला आहे.

रामटेक इथं विशाल बरबटे यांच्या प्रचारासाठी भास्कर जाधव यांनी सभा घेतली. या मतदारसंघात काँग्रेसचे राजेंद्र मुळीक यांनी बंडखोरी केली आहे. मात्र मुळीकांच्या बंडखोरीला सुनील केदार, खासदार श्यामकुमार बर्वे यांचा पाठिंबा आहे. त्यावरून भास्कर जाधव म्हणाले की, या भागात काँग्रेसला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मग इथं काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी बंडखोरी केली आहे. लोक महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मानतात. व्यक्ती मान्य करत नाही. मविआचे मतदार इथं मोठ्या प्रमाणात दिसतायेत. विशाल बरबटे यांच्या कार्यालयासमोर शिवसैनिक मोठ्या संख्येने जमले होते. ५ महिन्यापूर्वी या भागात काँग्रेसचा उमेदवार आपण लोकसभेसाठी उभा केला. त्याला रक्ताचे पाणी करून सर्वांनी निवडून आणलं. पक्ष बघितला नाही. ती निवडणूक एका ध्येयासाठी होती. अबकी बार ४०० पार देशाचे पंतप्रधान म्हणाले होते, कुठलाही पक्ष काहीही बोलत नव्हता. तेव्हा महाराष्ट्रातून सह्याद्रीच्या सुपुत्राची डरकाळी फुटली. उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणाले इसबार ४०० पार नाही तडीपार. तडीपार म्हणताना ठाकरेंनी कोणत्या पक्षाला किती उमेदवार याचा विचार केला नाही असं त्यांनी सांगितले. 

तर लोकसभेला पहिल्या टप्प्यातील पाचही जागा काँग्रेसने लढवल्या. रामटेक मतदारसंघाची जागा शिवसेनेची होती. मात्र मोठ्या मनाने ती जागा ठाकरेंनी काँग्रेसला दिली. कारण भाजपाला तडीपार करायचं म्हणून दिली. माझी जागा, तुझी जागा हा विचार उद्धव ठाकरेंनी केला नाही. तडीपार केले नाही तर देशाच्या संविधानाला धोका आहे. लोकशाहीला धोका आहे. देशाच्या अखंडतेला धोका आहे. हा धोका लक्षात घेता उमेदवार कोण, पक्ष कोण याचा विचार न करता वर्षानुवर्षे निवडून आलेली जागा काँग्रेसला दिली. मात्र विधानसभेला काँग्रेस नेत्यांचा काय एवढा मोठा आग्रह..२८ जागापैकी फक्त १ जागा पूर्व विदर्भात आम्ही लढवतोय. एक जागा लढवण्याइतपत शिवसेनेची ताकद आहे? भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, चंद्रपूरात ताकद नाही असं कोणाला वाटत असेल तर भल्याभल्यांनी शिवसेनेशी टक्कर घेतली आणि शिवसेनेने त्यांना माती दाखवली. शिवसेनेच्या स्वाभिमानाला कुणी हात घालू नका. आमच्या स्वाभिमानाला कुणी आव्हान देऊ नका. एकदा शिवसैनिक पेटला तर कुणाच्या बापाला ऐकत नाही असा इशारा भास्कर जाधवांनी काँग्रेसला दिला. 

दरम्यान, मला सुनील केदार यांना विचारायचं आहे, एक जागा आम्ही लढवतोय. मागे सुनील केदार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उद्धव ठाकरेंना शब्द दिला. या रामटेक विधानसभा मतदारसंघातील सहाच्या सहा जागा महाविकास आघाडीच्या निवडून आणेन असा विश्वास दिला. मात्र आज तुम्ही छत्रपतींचाही विश्वासघात करायला निघालात. महाविकास आघाडीचा आणि पक्षप्रमुखांचा विश्वासघात केला. नियती अशा लोकांना माफ करत नाही. तुम्हाला  एवढेच राजेंद्र मुळीकांबद्दल प्रेम आले होते, विधानसभेत निवडून जायचे होते मग त्यांना कामठीतून का उभे केले नाही. जर सुनील केदार यांना मविआत मिठाचा खडा व्हायचं नव्हते मग बँकेच्या घोटाळ्याबद्दल तुमच्यावर आरोप आहे. तुम्ही निवडणूक लढवू शकत नव्हता. पक्षाबद्दल एवढे प्रेम होते, तर पत्नीला उमेदवारी देण्याऐवजी राजेंद्र मुळीक यांना सावनेरची जागा का दिली नाही. तुमच्या भ्रष्टाचारामुळे तुम्हाला निवडणूक लढवता येत नाही. इतके कसे तुम्ही उलटे फिरता, नियती यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा घणाघात जाधवांनी सुनील केदार आणि खासदार श्यामकुमार बर्वे यांच्यावर केला.  

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 - Thackeray group leader Bhaskar Jadhav criticizes Congress leader Sunil Kedar, MP Shyam Kumar Barve over insurgency in Ramtek constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.