‘तो’ सर्व्हे काँग्रेसचा नाही, मविआला महाराष्ट्रात एवढ्या जागा मिळतील, नाना पटोलेंचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 03:38 PM2024-08-29T15:38:34+5:302024-08-29T15:41:10+5:30
Maharashtra Assembly Election 2024: काल काँग्रेसचा अंतर्गत सर्व्हे असल्याचा दावा करत एक सर्व्हे प्रसिद्ध झाला होता. या सर्व्हेमधून राज्यात महाविकास आघाडीला बहुमत मिळेल, तसेच काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरेल, असा दावा करण्यात आला होता. मात्र काँग्रेसचा अंतर्गत सर्व्हे असा दावा करत प्रसिद्ध करण्यात आलेला हा सर्व्हे काँग्रेसने केलेलाच नसल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे प्रसारमाध्यमांमधून वेगवेगळ्या संस्थांचे सर्व्हेही प्रसिद्ध होऊ लागले आहेत. दरम्यान, काल काँग्रेसचा अंतर्गत सर्व्हे असल्याचा दावा करत एक सर्व्हे प्रसिद्ध झाला होता. या सर्व्हेमधून राज्यात महाविकास आघाडीला बहुमत मिळेल, तसेच काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरेल, असा दावा करण्यात आला होता. मात्र काँग्रेसचा अंतर्गत सर्व्हे असा दावा करत प्रसिद्ध करण्यात आलेला हा सर्व्हे काँग्रेसने केलेलाच नसल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. तसेच येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला महाराष्ट्रात २०० हून अधिक जागा मिळतील, असा दावाही नाना पटोले यांनी केला.
माध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या काँग्रेसच्या सर्व्हेबाबत स्पष्टीकरण देताना नाना पटोले म्हणाले की, हा सर्व्हे काँग्रेसचा नाही आहे. त्याबाबत प्रसारमाध्यमांमधून चुकीची माहिती प्रसारित होत आहे. प्रत्यक्ष जमिनीवर काय वातावरण आहे, याचा अंदाज आम्हाला आहे. लोकसभा निवडणुकी वेळीही आम्ही तसा अंदाज सांगत होतो. आता विधानसभा निवडणुकीवेळीही राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण आहे. त्यामुळे महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये २०० च्या वर जागांवर विजयी होईल. असा आम्हाला विश्वास आहे, असा दावा नाना पटोले यांनी केला.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने केलेला अंतर्गत सर्व्हे म्हणून काल एक सर्व्हे प्रसिद्ध झाला होता. या सर्व्हेमध्ये राज्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरणार असून, काँग्रेसला ८० ते ८५ जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला ५५ ते ६० जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाविकास आघाडीतील तिसरा पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाला ३० ते ३५ जागा मिळतील, असेही या सर्व्हेमध्ये म्हटले होते.