नागपूर - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना काटोल इथं घडली. या हल्ल्यामागे भाजपा असल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्यावरून आता भाजपाने पुढे येत या संपूर्ण घटनेची चौकशी एसआयटीच्या माध्यमातून केली जावी. सहानुभूती मिळवण्यासाठी अनिल देशमुख यांनी हल्ल्याचे कुंभाड रचले आहेत. काटोल मतदारसंघात मुलाचा पराभव होणार हे पाहता अनिल देशमुखांनी अशाप्रकारे नौटंकी केली असून हा सगळा प्रकार संशयास्पद असल्याचं भाजपा नेते परिणय फुके यांनी म्हटलं आहे.
परिणय फुके म्हणाले की, अनिल देशमुख नेहमी या प्रकारचे कृत्य करतात. निवडणुकीत हरणार हे लक्षात आल्याने जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी हे करून जिंकण्याचा प्रयत्न करत असतात. हा फेक हल्ला आहे. सलील देशमुख निवडून येऊ शकत नाही त्यामुळे त्यांनी आपल्यावरच बनावट दगडफेक करून घेतली. काटोलची जनता याला बळी पडणार नाही. मी निवडणूक प्रचारात अशाप्रकारे काही ना काही होणार अशी भीती दर्शवली होती असं त्यांनी सांगितले.
हल्ला संशयास्पद का वाटतो?
अनिल देशमुख ज्या रस्त्याने जात होते, तो रस्ता अतिशय चांगला होता, तिथे कुठलेही स्पीड ब्रेकर नव्हते. त्यामुळे तिथे गाडीचा वेग कमी होईल अशी कुठलीही स्थिती नव्हती.
जर एखाद्या गाडीवर दगडफेक झाली, तर कुठलाही व्यक्ती तिथे थांबत नाही. तो तिथून निघून जातो. ड्रायव्हरच्या बाजूची काच फुटलेली नाही, बाजूच्या सीटसमोरील काच फुटलेली दिसते.
अनिल देशमुखांच्या काचेवर जो दगड पडलाय, तो पाहिला असता जवळपास १० किलोचा तो दगड आहे तो कुणीही लांबून फेकू शकत नाही. तो दगड जवळून फेकला असता तर हल्लेखोरांपैकी एखाद्याचा चेहरा त्यांना दिसला असता.
जर फोटो पाहिला तर त्यात १० किलोच्या दगडाने काच फुटलेली नाही, काचेला तडा गेला आहे. तो दगड काचेवर पडून बोनेटवर पडतो मात्र तसे झाले नाही. दुसऱ्याने दगडाने काच फोडली आणि हा मोठा दगड आणून त्याठिकाणी ठेवल्याचे दिसते.
त्याशिवाय ड्रायव्हर शीटच्या मागील बाजू काच फुटलेली आहे हा दगड एका फोटोत पायाजवळ दिसतोय. मागील १० वर्षापासून अनिल देशमुखांच्या सुरक्षेसाठी जो पोलीस विभागाचा बॉडीगार्ड असतो तो नेहमी त्यांच्यासोबत त्यांच्या कारमध्येच असतो. परंतु कालच्या घटनेत तो बॉडीगार्ड मागच्या गाडीत असल्याचं सांगण्यात आले. मागची गाडी इतकी दूर कशी होती जी घटनास्थळी पोहचू शकली नाही हा देखील संशय आहे. चुकीचे नॅरेटिव्ह अनिल देशमुख पसरवण्याचा प्रयत्न करतायेत असा आरोपही परिणय फुके यांनी केला.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांना जनता नाकारत आहे. आणखी काही नेते अशाप्रकारे कट रचण्याची शक्यता आहे. ५ वर्षापूर्वी माझ्यासोबतच असेच घडले होते. नाना पटोलेंनी स्वत:च्या हाताने त्यांच्या पुतण्याचं डोकं फोडून परिणय फुकेने ही घटना घडवली असा आरोप केला. त्यानंतर साकोली विधानसभेतील जनतेने त्यांना मतदान केले आणि जिंकून आले. नाना पटोले, गोपाल अग्रवाल, बंटी शेळके, विजय वडेट्टीवार अशाप्रकारे बनावट कृत्य करू शकतात. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या हल्ल्याची आजच्या आज सखोल चौकशी व्हायला हवी अशी मागणी भाजपा नेते परिणय फुके यांनी केली.