काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी नावं येऊ लागली पुढे; भाषणांमधून नेत्यांचे संकेत, महिला नेत्याचीही चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 11:28 AM2024-11-12T11:28:10+5:302024-11-12T11:28:56+5:30

राज्यात महायुती आणि मविआ यांच्यात मुख्यमंत्रि‍पदाच्या नावाबाबत अनेकदा चर्चा होते. काँग्रेसमध्येही या पदासाठी रस्सीखेच असल्याचं दिसून येत आहे. 

Maharashtra Assembly Election 2024 - The names of Yashomati Thakur, Nana Patole and Balasaheb Thorat are discussed for the post of CM Post in Congress | काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी नावं येऊ लागली पुढे; भाषणांमधून नेत्यांचे संकेत, महिला नेत्याचीही चर्चा

काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी नावं येऊ लागली पुढे; भाषणांमधून नेत्यांचे संकेत, महिला नेत्याचीही चर्चा

मुंबई - राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने जोर धरला आहे. त्यात निवडणुकीच्या निकालानंतर आमचीच सत्ता येणार असा दावा प्रत्येक पक्ष करत आहे. यातच मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू आहे. काँग्रेसमध्ये अनेक नेते मुख्यमंत्रि‍पदासाठी इच्छुक आहेत. त्यात राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे नाव आघाडीवर आहे. त्याशिवाय विदर्भातील आक्रमक महिला नेत्या यशोमती ठाकूर यांच्याही नावाची चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातून बाळासाहेब थोरात हेदेखील मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच काँग्रेसमध्ये अनेक नाव मुख्यमंत्रि‍पदासाठी पुढे येत असल्याचं चित्र दिसून येत आहे.

अमरावतीतील तिवसा मतदारसंघात सलग तीनदा निवडून आलेल्या यशोमती ठाकूर यांचेही नाव मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत आहे. महिला आक्रमक चेहरा म्हणून यशोमती ठाकूर यांच्याकडे पाहिले जाते. मोदी लाटेतही ठाकूर यांनी त्यांचा मतदारसंघ कायम राखला होता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत ठाकूर यांच्या त्या कन्या आहेत. मेघालय आणि कर्नाटकच्या निवडणुकीत त्यांनी प्रभारी म्हणून काम सांभाळले आहे. राज्याचे प्रदेश कार्याध्यक्षपदही यशोमती ठाकूर यांच्याकडे होते. राहुल गांधी यांच्या नागपूरातील संविधान संमेलन सभेनंतर यशोमती ठाकूर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. 

त्याशिवाय नुकतेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कन्या प्रिया पटोले यांनी प्रचारावेळी केलेल्या विधानाने अनेकांचे लक्ष वेधले. लाखनी तालुक्यातील प्रचारात प्रिया पटोले यांनी मतदारांशी संवाद साधताना आमदाराला नव्हे मुख्यमंत्रि‍पदाच्या माणसाला मतदान करा असं म्हटलं. गावकऱ्यांशी बोलताना त्या म्हणाल्या की, येत्या २० तारखेला आपल्याला कोणाला मतदान करायचं हे माहिती आहे. इथं एका आमदाराला नव्हे तर मुख्यमंत्रि‍पदासाठी असलेल्या माणसाला मतदान करायचं आहे हा विचार करून तुम्ही जा असं सांगितले आहे. नाना पटोले यांच्या नावे मुख्यमंत्रि‍पदासाठी आघाडीवर आहे. मागे विदर्भातील नेत्यांकडूनही पटोलेंच्या कार्यशैलीचं कौतुक करत त्यांना मुख्यमंत्रिपद मिळावं अशी मागणी केली होती. 

दरम्यान, या २ नावांशिवाय तिसरं नावही मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेत येते. अहिल्यानगर येथे एका भाषणात अमित देशमुख यांनी त्या नावाचे संकेत दिलेत. बाळासाहेब थोरात हे आमच्या कुटुंबाचे सदस्य आहेत असं मी मानतो. विलासराव देशमुखांच्या खांद्याला खांदा लावून, त्यांचे विश्वासू सहकारी म्हणून महाराष्ट्रात काम केले. आज एवढ्या जनतेला पाहिले की माझ्यासमोर महाराष्ट्र बसला आहे असं वाटतं आणि मागे वळून पाहिले तर महाराष्ट्राचा नेता इथं विराजमान आहे ही भावना मनात जागरूक झाल्याशिवाय राहत नाही. महाराष्ट्रात आम्ही जो लढा उभा केला आहे. हा लढा ज्या नेतृत्वाखाली उभा राहतोय ते नाव म्हणजे बाळासाहेब थोरात आहे. मला १९९९ ची आठवण होते, आज जयश्रीताईने जशी यात्रा काढली तशीच मी लातूर विधानसभेत काढली होती. १९९९ विलासराव देशमुख सर्वाधिक मतांनी काँग्रेस उमेदवारांमध्ये निवडून आले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली. तसेच आता इथं घडतेय की काय, उद्या तुम्ही राज्याचे नेतृत्व कराल तेव्हा आमच्याकडेही लक्ष द्या असं सांगत अमित देशमुखांनी बाळासाहेब थोरातांच्या मुख्यमंत्रि‍पदाचे संकेत दिलेत. 
 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 - The names of Yashomati Thakur, Nana Patole and Balasaheb Thorat are discussed for the post of CM Post in Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.