"संजय राऊत आणि आमच्यात वाद नाही, पण..." नाना पटोले यांनी स्पष्ट केली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 12:29 PM2024-10-19T12:29:33+5:302024-10-19T12:30:46+5:30

Maharashtra Assembly Election 2024: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत  यांच्यात खडाजंगी झाल्याचं बातम्या काल आल्या होत्या. मात्र आज नाना पटोले यांनी आपल्यामध्ये अशा प्रकारचा कुठलाही वाद झाला नसल्याचे सांगत, सगळ्या चर्चेचे खापर प्रसारमाध्यमांवर फोडले आहे.

Maharashtra Assembly Election 2024: "There is no dispute between Sanjay Raut and us, but..." Nana Patole explained the role | "संजय राऊत आणि आमच्यात वाद नाही, पण..." नाना पटोले यांनी स्पष्ट केली भूमिका

"संजय राऊत आणि आमच्यात वाद नाही, पण..." नाना पटोले यांनी स्पष्ट केली भूमिका

विधानसभा निवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख अगदी जवळ आली तरी राज्यातील सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षातील महाविकास आघाडी यांच्यामधील जागावाटप पूर्ण झालेलं नाही. त्यात महाविकास आघाडीमध्ये काही जागांवरून काँग्रेस आणि ठाकरे गट हे आमने सामने आलेले दिसत आहेत. तसेज जागावाटपावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत  यांच्यात खडाजंगी झाल्याचं बातम्या काल आल्या होत्या. मात्र आज नाना पटोले यांनी आपल्यामध्ये अशा प्रकारचा कुठलाही वाद झाला नसल्याचे सांगत, सगळ्या चर्चेचे खापर प्रसारमाध्यमांवर फोडले आहे. मात्र काँग्रेस हा महाराष्ट्रातील मूळ पक्ष असून, महाविकास आघाडीमध्ये जागावाटप हे मेरिटच्या आधारावर झालं पाहिजे, असा पुनरुच्चारही त्यांनी केला आहे. 

संजय राऊतांसोबत झालेल्या वादाच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, काल चाललेल्या बातम्यांबाबत आमचे मित्र संजय राऊत यांनी सकाळी स्पष्टीकरण दिलं आहे. आपण असं काहीच बोललो नाही, असे त्यांनी सांगितले. मात्र काल दिवसभर वृत्तवाहिन्यांवर यासंदर्भातील बातम्या सुरू होत्या. मी सुद्धा संजय राऊत नेमकं काय बोलले, असं विचारलं असता प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मला काही दाखवू शकली नाहीत. खरंतर हजारो मतदारांची मतदारयादीमधून नावं कमी करण्यात येत असल्याची बातमी चालवायला हवी होती, ती बातमी महत्त्वाची होती, मात्र तसं झालं नाही.  लोकशाही वाचवणं ही चौथ्या स्तंभाचीही जबाबदारी आहे. महायुतीमध्येही मारामाऱ्या सुरू आहेत, चंद्रपूरमध्ये मारामाऱ्या झाल्या, संघाचं शिस्तबद्ध असलेल्या नागपूरमध्ये मारामाऱ्या झाल्या. त्या बातम्याही महत्त्वाच्या आहेत, असे नाना पटोले यांनी सुनावले.  

संजय राऊत यांनी काँग्रेसच्या सिस्टिमबाबत विधान केलं होतं. मी त्यांना आमची सिस्टिम समजावून सांगितली. आमच्या पक्षाचे हायकमांड असतात. हायकमांडला सगळी माहिती द्यावी लागते. शेवटी हायकमांड निर्णय घेतात. संजय राऊत आणि आमच्यामध्ये कुठलाही वाद नाही आहे. तुम्हीच वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहात, असे नाना पटोले प्रसारमाध्यमांना उद्देशून म्हणाले.

ज्या जागा मेरिटच्या असतील, त्या त्या पक्षांनी घ्याव्यात, हे आम्ही आधीच स्पष्ट केलेलं आहे. त्या पद्धतीची भूमिका आम्ही मांडलेली आहे. महाराष्ट्रात महाराष्ट्रद्रोही भाजपा सरकार बसलेलं आहे. महाराष्ट्राला वाचवण हा आमचा धर्म आहे, हे आम्ही अनेकदा सांगितलं आहे. मात्र मेरिटच्या आधारावरच जागावाटप व्हावं, ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे, असेही नाना पटोले यांनी यावेळी स्पष्ट केले. 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024: "There is no dispute between Sanjay Raut and us, but..." Nana Patole explained the role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.