Maharashtra Assembly Election 2024 : मुबंई : लोकसभा निवडणुकीत अधिकृत जागा वाटप जाहीर करणाऱ्या महाविकास आघाडीला विधानसभेत मात्र जागा वाटपाचा गोंधळ अजून निस्तरता आलेला नाही. तीनही पक्षांचे राज्यातील दिग्गज नेते, दिल्लीतील काँग्रेसचे नेते जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी बेठकांवर बेैठका घेत आहेत. तिढा काही सुटलेला नाही.
उमेदवारी अर्ज भरायला केवळ दोन दिवस शिल्लक असताना मविआचे २३ मतदारसंघातील उमेदवार जाहीर व्हायचे बाकी आहेत. काही जागांवर मित्र पक्षांत तिढा आहे. काही जागांवर एकापेक्षा जास्त उमेदवार इच्छुक असल्याने ते पक्ष उमेदवार निश्चित करू शकले नाहीत. काॅंग्रेस व शरद पवार गटातील तिढा सोडवण्यासाठी रविवारी काॅंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली.
मतदार दूर जाण्याची भीती...मविआतील जागा वाटपाच्या गोंधळामुळे तीनही पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच इतर नेते संभ्रमात आहेत. याशिवाय लोकसभा निवडणुकीत मविआला मतदान करणारा मतदारही या गोंधळामुळे आमच्यापासून दूर जाईल, अशी भीती मविआतील एका नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली
दोन जागांवर दोन पक्षांचे उमेदवार- मविआकडून आतापर्यंत जागा वाटपाचे दोन वेगवेगळे फॉर्म्युले जाहीर करण्यात आले आहेत. पहिला ८५-८५-८५ जागांचा फॉर्म्युला तीनही पक्षांच्या नेत्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी जाहीर केला. - दुसरा ९०-९०-९० चा फॉर्म्युला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी जाहीर केला. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार मविआत काही जागांवर अजूनही वाद सुरू आहे. त्याबाबत मविआतील नेते काहीच बोलायला तयार नाहीत. - दुसरीकडे अशाच वादाच्या दोन जागांवर मविआच्या दोन पक्षांनी आपले उमेदवारही जाहीर केले आहेत. यात दिग्रस मतदारसंघातून काँग्रेसचे माणिकराव ठाकरे तर उद्धव सेनेचे पवन जयस्वाल आणि परांडा मतदारसंघात शरद पवार गटाचे राहुल मोटे आणि ठाकरे गटाचे राहुल पाटील यांचा समावेश आहे.आहे.
कोणते मतदारसंघ अजून कोरडे?१. सिंदखेडा, २. शिरपूर, ३. अकोला पश्चिम, ४. दर्यापूर, ५. वरूड-मोर्शी, ६. पुसद, ७. पैठण, ८. बोरिवली, ९. मुलुंड, १०. मलबार हिल, ११. कुलाबा, १२. खेड आळंदी, १३. दौंड, १४. मावळ, १५. कोथरूड, १६. औसा, १७. उमरगा, १८. माढा, १९. वाई, २०. माण, २१. सातारा, २२. मिरज, २३. खानापूर
मित्र पक्षाला सोडलेले मतदारसंघ१. भिवंडी पूर्व - सपा, २. मानखुर्द शिवाजीनगर - सपा, ३. पेण - शेकाप, ४. अलिबाग - शेकाप, ५. श्रीवर्धन - शेकाप, ६. कळवण- माकप, ७. डहाणू - माकप.