महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये शरद पवार आणि अजित पवार हे काका पुतणे एकमेकांबाबत अनेक दावे प्रतिदावे करत आहेत. दरम्यान, २०१९ विधानसभा निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या सत्तास्थापनेच्या तिढ्यामधून मार्ग काढून सरकार स्थापन करण्यासाठी उद्योगपती गौतम अदानी यांच्या निवासस्थानी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये बैठक झाली होती. तसेच त्या बैठकीला शरद पवार हेही उपस्थित होते, असा दावा अजित पवार यांनी केला होता, अजितदादांच्या या दाव्यामुळे मोठा गहजब झाला होता. तसेच शरद पवार यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली होता. दरम्यान, आता शरद पवार यांनी त्या बैठकीबाबत पुन्हा एकदा मोठा गौप्यस्फोट केला आहे.
अजित पवार यांनी केलेल्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी सांगितले की, ही बैठक झाली होती, ते ठिकाण महत्त्वाचं होतं. गौतम अदानी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक झाली होती. गौतम अदानी यांनी मेजवानी दिली होती. मात्र त्यांनी राजकीय चर्चेत सहभाग घेतला नव्हता. मी स्वत: तिथे होतो. अमित शाह आणि अजित पवार हेही तिथे होते. तिथे सरकार स्थापन करण्यासाठी सत्ता वाटपाबाबत चर्चा झाली. त्यानंतर अजित पवार यांनी सकाळी सकाळी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. मात्र हे सरकार केवळ ८० तासच चाललं.
दरम्यान, या बैठकीबाबत मोठा गौप्यस्फोट करताना अजित पवार म्हणाले होते की, ५ वर्षापूर्वी काय घडले, कुठे बैठक झाली, त्यात कोण होते हे सगळ्यांना माहिती आहे. अमित शाह होते, गौतम अदानी होते, प्रफुल पटेल, देवेंद्र फडणवीस मी स्वत: आणि शरद पवारसाहेबही बैठकीत होते. मात्र या बैठकीतील गौतम अदानी यांच्या सहभागाबाबत अजित पवार यांनी यूटर्न घेत त्या बैठकीत अदानी यांचा राजकीय सहभाग नव्हता, अशी सारवासारव केली.