कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही, काँग्रेसने उगारला कारवाईचा बडगा; सहा बंडखोर निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 08:34 AM2024-11-08T08:34:08+5:302024-11-08T08:34:37+5:30
Maharashtra Assembly Election 2024: महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांविरोधात काँग्रेसच्या ज्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले नाहीत त्या सर्व बंडखोरांवर कारवाई करण्यात आली असून त्यांना ६ वर्षांसाठी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे.
मुंबई - महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांविरोधात काँग्रेसच्या ज्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले नाहीत त्या सर्व बंडखोरांवर कारवाई करण्यात आली असून त्यांना ६ वर्षांसाठी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे. राज्यात कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही, असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी स्पष्ट केले आहे. गुरुवारी टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
बीकेसीतील महाराष्ट्र स्वाभिमान सभेत मविआने लोकसेवेची पंचसूत्री जाहीर केलेली आहे, त्याचा घरोघरी जाऊन प्रचार केला जाईल. १० नोव्हेंबर रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल ग्रँड हयात येथे मविआचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत हे उपस्थित असतील, असेही चेन्नीथला यांनी सांगितले.
या बंडखोरांवर कारवाई
राजेंद्र मुळक रामटेक
याज्ञवल्क्य जिचकार काटोल
जयश्री पाटील सांगली
कमल व्यवहा कसबा
आबा बागुल पर्वती
मनीष आनंद शिवाजीनगर
‘भाजपने काँग्रेसविरोधात दिलेल्या जाहिराती खोट्या’
काँग्रेसने कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेश या राज्यात दिलेली आश्वासने पाळली नसल्याच्या आशयाची खोटी जाहिरात भाजपने दिल्याप्रकरणी काँग्रेसने गुरुवारी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया व पब्लिसिटी विभागाचे चेअरमन पवन खेरा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची मंत्रालयात भेट घेतली आणि तक्रार दिली.
कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेशात काँग्रेसने ज्या गॅरंटी जाहीर केल्या त्याची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र, काँग्रेसने अंमलबजावणी केली नाही, अशा खोट्या जाहिराती भाजपने वर्तमानपत्रातून दिल्या आहेत. काँग्रेस विरोधात जाणीवपूर्वक अपप्रचार करुन जनतेची दिशाभूल केल्यामुळे निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केल्याचे पवन खेरा यांनी सांगितले.
यूपीए सरकारने ७१ हजार कोटी रुपयांची शेतकरी कर्जमाफी केली होती, काँग्रेस पक्षाने हे करुन दाखवले आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी जाहीर केलेल्या ५ गॅरंटी लागू करण्यात कोणतीही अडचण येणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसचे दिग्गज नेते उतरणार प्रचारात
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले असून अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधी, कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते राज्याच्या विविध भागात जाहीर सभा घेणार असल्याचे चेन्नीथला यांनी सांगितले.