Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपला असून २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. या मतमोजणीनंतर महाराष्ट्रात कोणाचे सरकार स्थापन होणार आहे कळणार आहे. राज्यात २८८ जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत ४१३६ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. त्यापैकी ३६८ महिला उमेदवार आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारांसह ९.७ कोटी मतदार बुधवारी आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
मात्र असं असले तरी या विधानसभा निवडणुकीत ३१ असे उमेदवार आहेत ज्यांना स्वतःला मतदान करता येणार नाहीये. प्रत्येक राजकीय पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी असे उमेदवार उभे केले आहेत जे त्या मतदारसंघाचे मतदार नाहीत. प्रत्येक पक्षाने बाहेरच्या उमेदवारांना वेगवेगळ्या मतदारसंघात उमेदवारी दिली आहे. अशा सर्वपक्षीय ३१ उमेदवारांनी स्थानिक मतदारांकडून मते मागितली आहेत, पण ते स्वत:ला मतदान करू शकणार नाहीत.
आदित्य ठाकरे हे वांद्रे पूर्व येथील मतदार असून ते वरळी मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्यांना वरळी मतदारसंघात स्वतःसाठी मतदान करता येणार नाही. तसेच मिलिंद देवरा हे देखील वरळीमधून निवडणूक लढवत असून त्यांनाही स्वतःला मत देता येणार नाही. यासोबत देवेंद्र फडणवीस हे देखील नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असले तरी त्यांना स्वतःसाठी मत देता येणार नाहीये.
उमेदवार | मतदारसंघ | कुठे करणार मतदान |
देवेंद्र फडणवीस | नागपूर दक्षिण पश्चिम | नागपूर पश्चिम |
बाळासाहेब थोरात | संगमनेर | शिर्डी |
आदित्य ठाकरे | वरळी | वांद्रे पूर्वट |
सुधीर मुनगंटीवार | बल्लारपूर | चंद्रपूर |
विजयकुमार गावित | नंदुरबार | नवापूर |
अदिती तटकरे | श्रीवर्धन | पेण |
मिलिंद मुरली देवरा | वरळी | मलबार हिल |
रोहित पवार | कर्जत जामखेड | बारामती |
नवाब मलिक | मानखूर्द शिवाजीनगर | कलिना |
हिना विजय गावित | अक्कलकुवा | नंदुरबार |
ययाती मनोहर नाईक | करंजा | पुसद |
निलेश नारायण राणे | कुडाळ | कणकवली |
धीरज देशमुख | लातूर ग्रामीण | लातूर शहर |
झीशान सिद्दिकी | वांद्रे पूर्व | वांद्रे पश्चिम |
इम्तियाज जलील | औरंगाबाद पूर्व | औरंगाबाद मध्य |
संतोष बांगर | कळमनुरी | हिंगोली |
जितेंद्र मोघे | अर्णी | दिग्रस |
अभिजित अडसूळ | दर्यापूर | कांदिवली |
मीनल खतगावकर | लोहा | देगलूर |
आशिष देशमुख | सावनेर | नागपूर पश्चिम |
विजय अग्रवाल | अकोला पश्चिम | अकोला पूर्व |
सतीश चव्हाण | गंगापूर | औरंगाबाद (पश्चिम) |
गोपीचंद पडळकर | जत | खानापूर |
अमल महाडिक | कोल्हापूर दक्षिम | हातकणंगले |
केदार दिघे | कोपरी पाचपाखाडी | ओवळा माजीवाडा |
वैभव नाईक | कुडाळ | कणकवली |
विनोद शेलार | मालाड पश्चिम | कांदिवली पूर्व |
शायना एनसी मुनोत | मुंबादेवी | मलबार हिल |
अशोक उईके | राळेगाव | यवतमाळ |
विजयकुमार देशमुख | सोलापूर शहर उत्तर | सोलापूर शहर मध्य |
सुभाष देशमुख | सोलापूर दक्षिण | सोलापूर शहर मध्य |
(माहिती सौजन्यः प्रेमदास राठोड)
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत भाजप १४९ जागांवर, शिवसेना ८१ जागांवर, राष्ट्रवादी ५९ जागांवर आणि इतर पक्ष ६ जागांवर निवडणूक लढवत आहेत. तर महाविकास आघाडीतील काँग्रेस १०१ जागांवर, शिवसेना ९५ जागांवर, ८६ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि ८ जागांवर इतर पक्ष निवडणूक लढवत आहेत. याशिवाय वंचित बहुजन आघाडी २००, मनसे १२५, एमआयएम १७, बहुजन विकास आघाडी आठ जागांवर निवडणूक लढवत आहे.