"राज्यात तिसरी आघाडी बनवून..."; अजित पवार-राज ठाकरेंबाबत रोहित पवारांचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 05:06 PM2024-08-29T17:06:07+5:302024-08-29T17:10:51+5:30
महायुतीचे आकडे कुठेच जुळेना यासाठी राज्यात तिसरी आघाडी बनवली जाऊ शकते. त्यातून मविआचे मते खायचं काम ही आघाडी करेल असा आरोप रोहित पवारांनी केला.
नवी दिल्ली - मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं अजित पवार गुलाबी यात्रेत माझी लाडकी बहिण योजना करतात. त्याच यात्रेत अजितदादा वेगळी भूमिका घेतायेत. आज आंदोलनाला सुरुवात होते त्यामुळे राज्यात तिसरी आघाडी निर्माण होण्याचा अंदाज आहे. त्यात मनसेही येऊ शकते. त्यात अजून पक्षसोबत येतील. या सर्वांचे काम सुपारी घेऊन महाविकास आघाडीची मते खायची हेच काम असेल असा दावा आमदार रोहित पवारांनी केला आहे.
दिल्लीत पत्रकारांशी ते बोलत होते. रोहित पवार म्हणाले की, दिल्लीवरून फर्मान आलं असावं, आता आपलं कुठलेच गणित बसेना, महायुतीला कुठेच आकडे मिळेना. तर मग तिसरी आघाडी काढू. अजित पवार आणि त्यांचा पक्ष त्यासाठी पुढाकार घेईल. त्याला मनसे आणि इतर पक्ष जोडले जातील. या तिसऱ्या आघाडीचं काम शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसची मते खायची इतकेच असणार आहे. निवडून आले नाही तरी चालेल पण मते खायची. त्याची सुरुवात आज अजित पवारांच्या आंदोलनापासून झाली आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच तुमचे लोक पैसा खाण्यासाठी एकत्र आणि राजकीय पोळी भाजण्यासाठी तुम्ही वेगळी भूमिका घेत असाल तर कदाचित तिसऱ्या आघाडीची सुरुवात झाली असं बोलावे लागेल. आज आंदोलन केले, उद्या भाजपाविरोधात बोललं जाईल. मग हळूहळू आम्हाला इतक्याच जागा हव्यात, १०० जागा हव्यात मग भाजपा म्हणणार २० जागा देतो. मग त्यातून ते वेगळे होतील आणि इतर २-३ पक्षांना घेऊन सुपारीबाज पक्षांची संघटना होईल आणि ती आघाडी मते खाण्यासाठीच होईल अशी चर्चा होईल. भाजपा हुशार आहे. दिल्लीत बसून समीकरण बनवतात. असेच समीकरण लोकसभेला केले. काही पक्षांना वेगळे उभे केले. परंतु २०१९ एवढी मते त्यांना मिळाली नाहीत. महाराष्ट्राच्या लोकांना भाजपाची स्ट्रॅटर्जी कळाली आहे. त्यामुळे किती आघाडी उघडली तरी त्यांना यश येणार नाही असं त्यांनी म्हटलं.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला तिथे अजित पवारांनी माफी मागितली हे चांगली बाब. परंतु आम्ही ६ हजार कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा काढला त्यात माफी मागता येत नाही. बदलापूरला जिथं लहान मुलींवर अन्याय झाला, महिलांवर अत्याचार होतायेत तिथे माफी मागता येत नाही. तुमचे मित्रपक्ष भाजपा थोर व्यक्तींवर बोलतात तिथे तुम्ही काही बोलत नाही. एमआयडीसीत जो भ्रष्टाचार होतो तिथे तुम्हाला माफी मागता येत नाही. जे प्रकल्प गुजरातला जातात तेव्हा माफी मागता येत नाही. हिंमत असेल तर ज्या चुका महायुती सरकारने केल्या त्याबाबत अजित पवारांनी उघडपणे सभा घ्याव्यात असा इशारा रोहित पवारांनी अजित पवारांना दिला.
...आम्ही कुठे शांत बसणार?
बदलापूरला दुर्दैवी घटना घडली त्याचा विरोध करण्यासाठी सामान्य माणसांसह आम्ही रस्त्यावर उतरलो तेव्हा एकनाथ शिंदे म्हणाले आम्ही राजकारण करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्यात भ्रष्टाचार झाला तर त्याचा विरोध आम्ही करणारच, त्यांचे गावगुंड येऊन तमाशा करणार असतील तर आम्ही कुठे शांत बसणार आहे? तो पुतळा २ कोटी खर्च करून बनवला. उद्धाटनाला मोदींच्या हेलिपॅडसाठी अडीच कोटी खर्च केले. मोदींना खुश करण्यासाठी ७५ लाखांचा खर्च केला. ५० हजार कोटींचा भ्रष्टाचार या सरकारने गेल्या २ वर्षात केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकातही भ्रष्टाचार करतायेत असा निशाणा रोहित पवारांनी सरकारवर साधला.