यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 07:21 AM2024-11-23T07:21:34+5:302024-11-23T07:22:52+5:30
Tiwasa constituency Vidhan Sabha Election 2024: तहसील कार्यालय आवारात नवनिर्मित प्रशासकीय इमारतीत मतमोजणी करण्यात येणार आहे.
तिवसा - तिवसा विधानसभा मतदारसंघाचा भावी आमदार कोण असणार, याचा फैसला आज होणार आहे. यावेळी तिवसा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडी यांच्यात दुहेरी लढत झाली असून, कुणाच्या पारड्यात विजयाचे पान पडणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतदानयंत्रे ठेवलेली स्ट्राँगरूम निवडणूक प्रतिनिधींसमक्ष उघडण्यात येणार असून, त्यासाठी निवडणूक उमेदवार व प्रतिनिधींना उपस्थित राहण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. मतमोजणीकरिता एकूण १२ टेबल लावण्यात आले असून, त्यापैकी पोस्टल बॅलेटचे पाच टेबल, ईटीपीबीएसचे दोन टेबल व ईव्हीएम मतमोजणीचे १४ टेबल लावण्यात आले आहेत. या टेबलवर मतमोजणीच्या एकूण २३ फेऱ्या होणार आहेत. निवडणूक निकालाची उत्सुकता असलेल्या नागरिकांसाठी निकालाबाबत टप्प्याटप्प्याची माहिती जाणून घेण्यासाठी तिवसा येथील दिवाणी न्यायालयाच्या मागच्या मैदानात व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मिन्नू पी. एम. यांनी दिली
नवीन इमारतीत होणार मतमोजणी
तहसील कार्यालय आवारात नवनिर्मित प्रशासकीय इमारतीत मतमोजणी करण्यात येणार आहे. तेथे मतमोजणी व निवडणूक निकालासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी तयारी करण्यात आली.
तर्कवितर्कांना उधाण
यंदा कोण निवडून येणार याबाबत प्रत्येकाकडून तर्कवितर्क लावण्यात येत आहे. महायुतीच्या उमेदवाराला खरंच लाडकी बहीण साथ देणार, की आपल्या लाडक्या बहिणीसाठी जिवाचे रान करणाऱ्या भावांच्या प्रयत्नांना यश येणार, हे शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे.