महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ चा बिगूल वाजल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष कंबर कसून निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. साधारणपणे सर्व पक्षांनी बहुतांश जागांवर आपले उमेदवारही जाहीर केले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपनेही आपल्या ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात धुळे शहर विधानसभा मतदारसंघासाठी अनुप अग्रवाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यानंतर आता अनुप अग्रवाल यांना आव्हान देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाला तगडा उमेदवार मिळाला आहे. धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला असून त्यांना उमेदवारीही जाहीर करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे यांनी हाती भगवा देऊन केलं स्वागत धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे ह्यांनी आज मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या हातात शिवबंधन बांधून आणि हाती भगवा देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते विनायक राऊत, उपनेते अशोक धात्रक आणि इतर पदाधिकारी-शिवसैनिक उपस्थित होते.
धुळ्यात भाजप Vs शिवसेना ठाकरे गट यापूर्वी, अनिल गोटे यांनी लोकसंग्राम पक्ष म्हणून लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. मात्र आता स्वतंत्र पक्षाऐवजी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढणेच त्यांनी पसंत केले. यामुळे आता धुळे शहर विधानसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी चुरशीची लढत बघायला मिळणार हे स्पष्ट झाले आहे.
अनिल गोटे यांच्याकडे 2 पर्याय होते तत्पूर्वी, या पक्षप्रवेशासंदर्भात माध्यमांसोबत संवाद साधताना संजय राऊतांसोबत चर्चा झाल्याचेही अनिल गोटे यांनी सांगितले होते. तसेच, कार्यकर्त्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला. आमच्याकडे 2 पर्याय होते, एक म्हणजे स्वतंत्र लोकसंग्राम म्हणून निवडणूक लढविण्याचा आणि दुसरा शिवसेना उबाठात प्रवेश करण्याचा. यामुळे कार्यकर्त्यांच्या निर्णयानंतर आपण 24 तारखेला ठाकरे गटात प्रवेश करणार आहोत, असेही अनिल गोटे यांनी सांगितले होते.