मुंबई - राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची निवडणूक आयोगाने बदली केल्यानंतर मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. रिक्त महासंचालक पदासाठी फणसळकर यांच्यापाठोपाठ संजय कुमार वर्मा, सदानंद दाते आणि रितेश कुमार यांच्या नावाचीही चर्चा आहे.
पोलिस महासंचालक रजनीश सेठ हे ३१ डिसेंबरला सेवानिवृत्त झाले. सेठ यांच्यानंतर राज्य सरकारने पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे सोपविला होता. मात्र, ४ जानेवारी रोजी महासंचालक म्हणून फोन टॅपिंगच्या आरोपांतून मुक्त झालेल्या शुक्ला यांच्या नियुक्तीचे आदेश जारी झाले.
बदली फक्त निवडणुकीपुरती?- शुक्ला यांची फक्त निवडणूक काळापर्यंत बदली करण्यात आली असून, निवडणुकीनंतर पुन्हा त्यांच्याकडे पदभार सोपविण्यात येणार असल्याचे समजते आहे.- नवीन डीजी हे फक्त निवडणूक काळापुरतेच मर्यादित असतील, अशीही चर्चा मुख्यालयात सुरू आहे.
बिपिन कुमार सिंग यांच्या नावाची चर्चा अन् ब्रेक१९९० च्या बँचचे महासंचालक बिपिन कुमार सिंग यांच्या नावाचीही सकाळपासून चर्चा होती. त्यांच्या कार्यालयीन माहितीत १९६५ चा जन्माची नोंद असल्यामुळे त्यानुसार, पुढच्या वर्षी ऑक्टोबर मध्ये निवृत्त होणार होते. मूळ जन्मतारीख १९६४ ची असल्याने ते तीन दिवसांपूर्वीच निवृत्त झाल्याचे समजले. ज्येष्ठतेनुसार त्यांच्या नावाची चर्चा होती. मात्र ते तीन दिवसांपूर्वी निवृत्त झाले असून तारखा मधील गोंधळामुळे नावाचा उल्लेख झाल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.
विरोधकांचे आरोप निवडणुकीच्या काळात शुक्ला यांना पदावरून हटवावे, अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती. विरोधकांनी केंद्रीय निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेत शुक्ला यांच्या कार्यकाळात निष्पक्ष निवडणूक पार पडणार नाही, असा आरोप केला. त्यानंतर आयोगाने सोमवारी शुक्ला यांची बदली केली.