पुणे - मतदानाची तारीख जवळ येत आहेत तसे महत्त्वाचे प्रश्न बाजूला ठेवून नवीन नरेटिव्ह करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या महाराष्ट्र पुढील ५ वर्षांत कोणाच्या हाती द्यायचा आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. अजित पवार म्हणाले की, भाजपसोबत आम्ही महायुतीमध्ये 'कॉमन मिनिमम प्रोग्रॅम' अंतर्गत सहभागी झालो आहोत. त्यांची विचारधारा वेगळी आहे. मात्र, आम्ही शाहू- फुले-आंबेडकरांची विचारधारा सोडलेली नाही. यापूर्वी आमची विचारधारा वेगळी असताना देखील अडीच वर्षे आम्ही उद्धव ठाकरे यांच्याबरोबर सरकार चालवले आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.
कारवाईची फाइल दाखवण्याच्या सुप्रिया सुळेंनी केलेल्या आरोपांवर ही माहिती कोणीही माहितीच्या अधिकारात मागवू शकतो, असे अजित पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी शरद पवारांनी भेटायला बोलावून फसवणूक केली, या आरोपांवर ते त्यांनाच विचारा, असे म्हणत अजित पवार यांनी बोलण्यास नकार दिला.
सभा घ्यायला मी सक्षम अजित पवार बारामतीत प्रचारासाठी माझ्याकडे कोणी येऊ नये. बाकीच्या २८७ मतदारसंघांमध्ये खूप काम आहे. बारामतीमधील जो काही वेळ आहे ती इतर ठिकाणी कामी आणण्यास सांगितले आहे. मी माझी सभा घ्यायला आणि प्रचार करायला सक्षम आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.