मुंबई - महाराष्ट्रात बंडखोर उमेदवारांची समजूत काढण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये बैठकांचा सिलसिला सुरू आहे. त्यात सोमवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. बंडखोरांनी अर्ज माघारी घ्यावा यासाठी राजकीय पक्षांकडे केवळ १ दिवस शिल्लक आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सहभागी होते. जवळपास ३ तास ही बैठक चालली. त्यात बंडखोरी रोखणं, अपक्षांना अर्ज माघारी घेण्याबाबत चर्चा करण्यात आली.
या बैठकीनंतर बंडखोरांना अर्ज मागे घेण्यासाठी शेवटचा प्रयत्न केला जाणार आहे. जर त्यांनी मान्य केले तर ठीक अन्यथा त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यात येणार आहे. आज रात्री १० च्या सुमारास काही उमेदवारांना मुख्यमंत्री निवासस्थानी बोलवण्यात आले आहे. भाजपा आणि शिंदे गटाचे जवळपास २० बंडखोर निवडणुकीच्या रिंगणात आहेत ज्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. महायुतीचं बोलायचं झालं तर ३५ नेत्यांनी बंडखोरी करत निवडणुकीच्या मैदानात अपक्ष अर्ज भरले आहेत. युतीचे प्रभारी बंडखोरांना समजवण्यासाठी मार्ग शोधत आहेत.
जर निश्चित कालावधीत बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही तर महायुतीसमोर मोठ्या अडचणी निर्माण होतील. त्यासाठी महायुतीतील नेत्यांसमोर बंडखोरांना लवकरात लवकर शांत करणे हे मोठं आव्हान आहे. महायुतीत सर्वात जास्त पेच माहिम मतदारसंघावरून आहे. याठिकाणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत तर शिंदे गटाकडून शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनी अर्ज भरला आहे. सदा सरवणकरांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी भाजपाकडून दबाव आहे. परंतु ते ऐकण्यास तयार नाहीत. त्यामुळे माहिममध्ये महायुतीत फूट पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शिंदे गटाच्या शिवसेनेविरोधात भाजपाचे ९ बंडखोर मैदानात आहेत. तर भाजपाविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचे ९ जणांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. राष्ट्रवादीविरोधात शिंदे गटातील ७ जणांनी अर्ज भरलेत. महाविकास आघाडीतही तीच स्थिती आहे. याठिकाणी शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात काँग्रेसचे बंडखोर आणि काँग्रेस उमेदवाराविरोधात ठाकरेंचे बंडखोर रिंगणात आहेत. त्यामुळे बंडखोरीने महायुती आणि महाविकास आघाडी यांची डोकेदुखी वाढवली आहे.